लातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे ता. 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संमेलन होणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर, तर स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर संमेलन येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या मैदानावर होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे उपस्थित राहतील. वारकरी संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित केले जात आहे. यापूर्वी नाशिक, नवी मुंबई, शेगाव, नांदेड व पुणे या ठिकाणी ही संमेलने झाली आहेत.
संमेलनाचा प्रारंभ सोमवारी (ता. 29) सकाळी सात वाजता दिंडी सोहळ्याने होईल. दिंडी सोहळ्याची सुरवात माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सात सत्रांत पार पडणाऱ्या या संमेलनात शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, पाणी नियोजन, वृक्षारोपण, हुंडामुक्त विवाह, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती आदी ज्वलंत विषयांवर परिसंवाद होणार आहेत. सांगता समारोहास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव सुमित मलिक, आमदार अमित देशमुख, पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत दळवी, औरंगाबादचे महसूल आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या संमेलनात नूतन संमेलनाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. या वेळी वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केलेल्या श्रीगुरू भगवान महाराज शिवणीकर यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केला जाईल. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार नामदेव महाराज शास्त्री व चकोर महाराज बाविस्कर यांना प्रदान केला जाणार आहे. अमृत जोशी महाराज यांना राज्याबाहेर वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराचे विशेष कार्य केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात येईल; तसेच वारकरी संप्रदायाची विशेष सेवा केल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांचाही सत्कार होईल.
|