ग्रामस्थांची धास्ती सरपंचाने मिटवली, दीड हजार ‘पाहुण्यां’ची करुन घेतली तपासणी

विकास गाढवे
गुरुवार, 26 मार्च 2020

पुणे, मुंबई येथून आलेल्या पाहुण्यांची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मुरूडच्या (ता. लातूर) गल्लीबोळातून सरपंच अभयसिंह नाडे यांना फोन येऊ लागले. यामुळे त्यांनी शक्कल लढवत गावात आलेल्या पाहुण्यांची एका दिवसात तपासणी करण्याचे नियोजन केले.

लातूर : पुणे, मुंबई येथून आलेल्या पाहुण्यांची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मुरूडच्या (ता. लातूर) गल्लीबोळातून सरपंच अभयसिंह नाडे यांना फोन येऊ लागले. यामुळे त्यांनी शक्कल लढवत गावात आलेल्या पाहुण्यांची एका दिवसात तपासणी करण्याचे नियोजन केले. त्यांची संकल्पना चाळीस खासगी डॉक्टरांनी उचलून धरत गुरुवारी (ता. २६) सकाळी तीन तासांत दीड हजारहून अधिक पाहुण्यांची तपासणी केली. यात एकही संशयित रुग्ण आढळून न आल्याने गावातील चर्चेला पूर्णविराम मिळाला.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात आजाराविषयी जागृतीसाठी गावात बसस्थानक, मंदिर, पाण्याच्या टाक्या आदी सहा ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून तसेच घरोघरी पत्रक वाटून माहिती दिली जात आहे. लातूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले मुरूड गावाची लोकसंख्या मोठी आहे. पुणे व मुंबईच्या पाहुण्यांचे दर्शन ग्रामस्थांना नित्याचे झाले आहे. यात गावातही दीड हजारहून अधिक पुणे, मुंबईकर दाखल झाले आहेत. पाहुण्यांच्या आगमनाची ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली असून, त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून त्याची माहिती ते ग्रामपंचायतीला देत आहेत. यात सरपंच नाडे यांना ग्रामस्थांकडून आजारी पाहुण्यांबाबत मोठ्या संख्येने फोन येऊ लागले.

वाचा ः वाचन संस्कृतीवर आली अवकळा, कशामुळे ? ते वाचा

सर्वांच्या तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडून सहकार्य मिळणे अशक्य होते. यामुळे त्यांनी गावातील डॉक्टर असोसिएशनला साकडे घातले. सर्व पाहुण्यांची एकाच दिवशी तपासणी करण्याचे नियोजन केले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल. एस. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची बैठक घेऊन तपासणीबाबत सूचना दिल्या. त्यानंतर डॉक्टरांची प्रभागनिहाय नियुक्ती करण्यात आली. सहा प्रभागात गुरुवारी सकाळी आठ ते अकरादरम्यान आशा कार्यकर्तींच्या मदतीने डॉक्टरांनी घरोघरी भेट देत पुणे व मुंबई येथून आलेल्यांची तपासणी केली. दीड हजारहून अधिक पाहुण्यांत एकही संशयित रुग्ण न आढळल्याने गावची चिंता मिटली. नव्याने दाखल होण्याऱ्या पाहुण्यांकडे आता आमचे लक्ष असल्याचे सरपंच नाडे यांनी सांगितले. या मोहिमेत डॉक्टरांचा मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
---


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch Effort, One Thousand Five Hundred Guest Checking, Latur