साताऱ्याच्या खंडोबाचे आगळेवेगळे रूप : मंदिराचेही पहा फोटो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

इंदूरच्या महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सातारा गावातील खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यापूर्वी या ठिकाणी उत्तर यादवकालीन मंदिराचे अवशेष आढळतात.

औरंगाबाद : 'येळकोट-येळकोट जय मल्हार'च्या घोषात खंडोबाच्या षड्‍रात्रोत्सवास बुधवारी (ता.27) सुरवात झाली. शहरालगतच्या सातारा गावातील पुरातन खंडोबा मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून, गावात मोठी जत्रा भरली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत असून, षड्‍रात्रोत्सवानिमित्त सहा दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी दिली. 

Satara Khandoba Temple Aurangabad Photos
षड्रात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या दिवशीचे खंडोबाचे तेजस्वी रूप

Satara Khandoba Temple Aurangabad
खंडोबाच्या दर्शनाला झालेली भाविकांची गर्दी

इंदूरच्या महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सातारा गावातील खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यापूर्वी या ठिकाणी उत्तर यादवकालीन मंदिराचे अवशेष आढळतात. लाल जांभ्या दगडात बांधलेल्या या मंदिरावर सुंदर अशी कलाकुसर आढळते. महेश्वरी शिल्पशैलीचा सुंदर प्रभाव या मंदिराच्या स्थापत्यावर आढळतो.  

Satara Khandoba Temple Aurangabad
सातारा गावातील महाराणी अहल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले खंडोबा मंदिर (सर्व छायाचित्रे - अॅड. स्वप्नील जोशी)

Satara Khandoba Temple Aurangabad
सातारा येथील खंडोबा मंदिराचे प्रवेशद्वार आणि नगारखाना

Satara Khandoba Temple Aurangabad
मंदिरातील नक्षीकाम

Satara Khandoba Temple Aurangabad
मंदिराच्या दरवाजाच्या उंबऱ्यातील हत्ती

सातारा येथे खंडोबा मंदिरात षड्‍रात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज हजारो भाविक यळकोट-यळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भंडारा आणि रेवड्यांची उधळण करून खंडोबाचे दर्शन घेत आहेत. अनेक भाविक वाघ्या-मुरळीकडून जागरण-गोंधळ घालत नवस पूर्ण करण्यासाठी साताऱ्याला येत आहेत. सोमवारी (ता. दोन) चंपाषष्ठीच्या दिवशी कुलाचार, कुलधर्माने षड्‍रात्रोत्सवाचा समारोप होणार आहे.

Satara Khandoba Temple Aurangabad
मंदिराच्या अंतराळातील छताचे जाळीदार गालिचासारखे बारीक कोरीवकाम

Satara Khandoba Temple Aurangabad
मंदिराच्या जोत्यावरील फुलणाऱ्या कमळाची नक्षी

तीन दिवस यात्रा उत्सव 

चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर यात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. तीन दिवस खंडोबाची यात्रा राहणार असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार असल्याने संस्थानने चोख व्यवस्था केली आहे. मनपाकडून भाविकांसाठी पाणी, पथदिवे, आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Satara Khandoba Temple Aurangabad Stepwell Barav
मंदिराच्या जवळच असलेली यादवकालीन बारव

वाघ्या-मुरळीचा गोंधळ

 

Satara Khandoba Temple Aurangabad
वाघ्या-मुरळीने मांडलेला चौक आणि पूजा करताना भाविक

डफ-तुणतुण्याच्या तालावर जागरण गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळी पथकांसाठी खंडोबा मंदिर परिसरात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर जागरण-गोंधळ घालण्यासाठी वाघ्या-मुरळीसमोर भाविकांची गर्दी होत आहे. ही जत्रा 15 दिवसांपर्यंत गावात रेंगाळते. यावर्षी यात्रेत सुमारे ३०० लहानमोठी दुकाने थाटली आहेत. पूजा-प्रसादाच्या साहित्यासह खेळणी, कपडे, घरगुती साहित्य, टुरिंग टॉकीजपासून जलसा, तमाशाच्या फडापर्यंत सर्व काही येथे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Khandoba Temple Aurangabad Photos