धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हीच सावरकरांची भूमिका...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद : देशात अनेक जाती आहेत. प्रत्येकाचे परस्परांशी व्यवहाराचे अनेक विधिनिषेध आहेत. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना संघटित करायचे असेल, तर धर्म कामाचा नाही. जगातले सर्व धर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्पष्ट भूमिका असल्याचे मत प्रा. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केले. 

अमेरिकेत पेन्न स्टेट येथील बेहरंड महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या डॉ. आशुतोष देशमुख यांनी लिहिलेल्या "ब्रेव्हहार्ट सावरकर' या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. 28) नांदेड येथील इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. बालाजी चिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Aurangabad News
'ब्रेव्हहार्ट सावरकर' पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) बलराम येरमे, प्रा. अश्‍विन रांजणीकर, डॉ. आशुतोष देशमुख, प्रा. बालाजी चिरडे. 

विवेक विचार मंच, महाराष्ट्र व अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अश्‍विन रांजणीकर, बलराम येरमे हेही उपस्थित होते. 

"अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांनी ब्रिटिशांना एक नव्हे, तर सात पत्रे लिहिली. पण त्यातील संदर्भांची मोडतोड करून त्यांना खोडसाळपणे माफीनामा म्हणून रंगवले जाते. गांधीहत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही कपूर कमिशनने अधिकारात नसताना केलेल्या टिप्पणीचा आधार घेऊन आजही सावरकरांना हिणवले जाते, हे निखालस खोडसाळपणाचे आहे,'' असे प्रा. चिरडे म्हणाले. प्रास्ताविक सागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित लांडगे, आभार प्रदर्शन निखिल चव्हाण यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savarkar Said, All Religion Books are out of Context