सिमेंटची रिकामी बॅग ऐंशी रूपयाला

सिमेंटची रिकामी बॅग ऐंशी रूपयाला

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रामेगाव (ता. औसा) येथे हा गॅबीयन बंधाऱ्यांच्या कामात 82 लाख रूपयाचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर त्यातील अनेक कारनामे समोर येत आहेत. यात बाजारात पाच रूपयाला मिळणाऱ्या  सिमेंटच्या रिकाम्या बॅगची (गोण्या) किंमत ऐंशी रूपये लावली आहे. तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक या दोघांनीच हा मोठा गैरव्यवहार केल्याचे सध्या पुढे येत असले तरी पडद्यामागे अनेक कलाकार लपल्याची चर्चा घडून येत आहे. यात कृषी सहायक एस. के. कसबे याच्याकडे केवळ या कामांसाठी पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी अशा दोन पदाचा दिलेला पदभारही लपून राहिला नाही.

दहा ते पंधरा हजार रूपयात होणाऱ्या एका कामांसाठी दोघांनी दहा लाखाचा खर्च दाखवला. यात कुशल कामाचा खर्च पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यात गॅबीयनसाठी आवश्यक जाळी ९४० रूपये किलो दराने दाखवून एका बंधाऱ्यासाठी दोनशे ते अडीचशे किलो जाळी खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. बायडिंग वायरही ३७५ रूपये किलो दराने खरेदी केले असून दगड खरेदी ५११ रूपये ब्रासने करून एका बंधाऱ्यासाठी ७२ ते शंभर ब्रास दगड खरेदी केल्याचे दाखवले आहे. सर्वात कहर म्हणजे बाजारात पाच रूपयापर्यंत मिळणाऱ्या रिकाम्या सिमेंटच्या पिवशीची किंमत ऐंशी रूपये दाखवण्यात आली आहे.

असा असतो गॅबीयन बंधारा 
छोटी नदी व नाल्यातील पाणी दगडाचा खिळगा टाकून अडवला जातो. हे हा खिळगा वाहून जाऊ नये व खिळग्याती दगड ढिले होऊन ते वाहून जाऊ नयेत म्हणून त्याला लोखंडी जाळीत बांधले जात. खरे तर हे काम दहा ते पंधरा हजार रूपयाचे आहे. एका लोखंडी जाळीत दगड भरणे व जाळवा बांधून घेऊन तात्पुरत्या वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण व्हावा आणि काही काळासाठी हे पाणी अडवले जावे किंवा मुरवले जावे, असा या बंधाऱ्याचा उद्देश आहे. वनराई बंधाऱ्यात रिकाम्या सिमेंट पोत्यात माती भरून एकावर एक ठेवले जातात. गॅबीयन बंधाऱ्यात सिमेंट पोत्याऐवजी लोखंडी जाळीत दगड टाकून पाणी अडवले जाते. या छोट्या कामांवर लाखोचा खर्च करून अधिकाऱ्यांनी गैरव्यवहाराचा उत्तम नमुना पुढे आणला आहे.

गॅबीयन बंधाऱ्याचे अंदाजपत्रकातील खर्चाची तरतुद

- अकुशल कामांसाठीचा एकुण खर्च -  ५८६० रूपये

- कुशल कामांसाठीचा एकुण खर्च - १८, ३१२ रूपये   

एका बंधाऱ्यावर दाखवलेला प्रत्यक्ष खर्च व गैरव्यवहार 

- अकुशल कामासाठी - ४,८४,२८३ रूपये ते ५,९३,३५२ रूपये - गैरव्यवहार - ४,७८,४२३ रूपये ते ५,८७,४९२ रूपये 

- कुशल कामासाठी - १,९४,६६८ रूपये ते ४,२६,०४६ रूपये - गैरव्यवहार - १,७६,३५६ रूपये ते ४,०७,७३४ रूपये

गैरव्यवहाराच्या उद्देशानेच फुगवटा
गॅबीयन बंधाऱ्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रूपये खर्चाची तरतुद असताना अधिकाऱ्यांनी गैरव्यवहाराच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात फुगवलेली अंदाजपत्रके तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केली. फुगवलेली अंदाजपत्रके तयार करणे ही गैरव्यवहाराची तयारी संगनमताने गैरव्यवहार करण्याची प्रवृत्ती व गैरव्यवहार करण्याच्या मानसिकतेच्या पहिल्या पायरीचे द्योतक आहे. कामांत गैरव्यवहार करावयाचा, असे ठरवूनच पहिल्या दिवसापासून ही अंदाजपत्रके तयार केल्याचे चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com