Scam : आदर्श बँकेच्या संचालकांनी वडखा गावालाही केलं टार्गेट; 30 लोकांच्या नावे कोट्यवधींचं कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scam : आदर्श बँकेच्या संचालकांनी वडखा गावालाही केलं टार्गेट; 30 लोकांच्या नावे कोट्यवधींचं कर्ज

Scam : आदर्श बँकेच्या संचालकांनी वडखा गावालाही केलं टार्गेट; 30 लोकांच्या नावे कोट्यवधींचं कर्ज

प्रकाश बनकर/विकास देशमुख

छत्रपती संभाजीनगर : आदर्श बँकेतील बनावट कर्ज प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. शेंद्रा कमंगर गावातील ४० जणांवर संक्रांत आणणाऱ्या बँकेच्या संचालकांनी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडखा गावालाही टार्गेट केले. गावातील ३० लोकांच्या नावावर परस्पर कोट्यवधींचे कर्ज उचलले. यात आतापर्यंत १५ जणांना नोटिसा आल्या. शेतकरी, खासगी कंपनीत काम करणाऱ्या सर्वसामान्य घरातील लोकांनाच संचालकांनी गंडवत आपला नेम साधला.

वडखा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील अशोक नारायण काकडे हा आदर्श पतसंस्था आणि आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या संचालक होता. त्यानेच गावातील ३० जणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर बनावट कर्ज उचल्याचा आरोप पीडितांनी केला. पण, यामुळे आता या गावातील ३० कुटुंबे तणावात आहेत. गावातील अनेकांची नावे कर्ज घेतलेल्यांच्या यादीत आहेत. मात्र, त्यांना अजून नोटिसा मिळालेल्या नाही. त्या कधीही येऊ शकतात, अशी भीती त्यांच्यात आहे.

प्रकरण- १

वर्गमित्रालाही सोडले नाही

रामकिसन गणपत सर्जे हे शेंद्रा कमंगर येथील खासगी कंपनीत कामाला आहेत. रामकिसन आणि त्यांच्या पत्नी मंजूषा सर्जे या दोघांच्या नावावर तब्बल ७ कोटींचे कर्ज असल्याची नोटीस आली. सात पिढ्यांनी रात्रंदिवस काम केले तरी हा एवढी रक्कम कमावू शकणार, असे त्यांनी सांगितले. रामकिसन हे नामदेव कचकुरे याचे वर्गमित्र आहेत. कचकुरे हा या प्रकरणातील संशयित आहे. रामकिसन यांनी आदर्श बँकेकडून एक कर्ज घेतले होते. शहरातील घर विकून त्यांनी ते फेडलेही. पण, या कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा वापर करीत त्यांच्या नावावर ५ कोटी ७८ लाख तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १ कोटी ४२ लाखांचे कर्ज बँकेच्या संचालकांनी परस्पर घेतले. एवढेच नाही तर सर्जे यांच्या समर्थ एंटरप्राइजेस या चालू खात्यातून ११ कोटींचा व्यवहारही परस्पर केला आहे.

प्रकरण- २

आता बँकेला पाठवली नोटीस

वडखा येथील वत्सलाबाई दत्तू नाईक यांच्या नावावर १ कोटी ९० लाखाचे बनावट कर्ज उचलण्यात आले. त्यांचे बँकेत खाते होते. वर्ष २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. आतापर्यंत त्यांना कोणतेही कर्ज बँकेकडून घेतले नव्हते; तरीही २०२१ मध्ये त्यांनी हे कर्ज घेतल्याची नोटीस काढण्यात आली. यामुळे नाईक कुटुंबीय तणावात आले. या प्रकरणी वकिलाच्या माध्यमातून बँकेला नोटीस पाठवली असल्याचे वत्सलाबाई नाईक यांचा मुलगा नारायण नाईक यांनी सांगितले.

प्रकरण- ३

बचत खाते होते; पण व्यवहार नव्हता

रामेश्‍वर बबन काकडे हे खासगी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या आई कुशीवर्ता काकडे यांच्या नावावर १ कोटी ७० लाखांचे कर्ज दाखवले जात आहे. बँकेत आईचे बचत खाते होते. मात्र, त्यावर कोणताही व्यवहार नव्हता. या संदर्भात बँकेत जाऊन विचारणा केली असता ‘तुमच्याच लोकांनी केले’ असल्याचे उत्तर मिळाल्याचे रामेश्‍वर सांगत होते. ‘‘वाहन चालवल्यानंतर घरातील चूल पेटते. आमची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यात आता न घेतलेले कर्ज आम्ही का फेडावे?’’, असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रकरण- ४

गायीवरून आईची फसवणूक

रघुनाथ काकडे यांनी सांगितले, ‘‘आई मैनाबाई पंडित काकडे यांचे आदर्श महिला बँकेने बचत खाते उघडले, तेव्हा महिलांना गाय वाटप केल्या होत्या. तेवढाच एक व्यवहार झाला होता. त्यानंतर कोणताही व्यवहार झाला नाही. बँकेतच आईचे पासबूक आणि कागदपत्रे होती. त्यांचा गैरवापर करून हे बनावट कर्ज उचलण्यात आले. या कर्जावरून आई सतत चिंतेत असते. या प्रकारातून आम्हाला सुटका हवी. कोणीच आमच्यासाठी पुढे येत नाही’’, अशी खंतही रघुनाथ काकडे यांनी व्यक्त केली.

यांना आल्या नोटिसा

रामकिसन गणपतराव सर्जे- ५ कोटी ७६ लाख रुपये

मंजूषा रामकिसन सर्जे- १ कोटी४२ लाख रुपये

वत्सलाबाई दत्तू नाईक (वडखा)- १ कोटी ९० लाख ६८ हजार

बाबासाहेब गंगाधर चौधरी (वडखा)- २ कोटी ५० लाख रुपये

कुशीवर्ताबाई बबन काकडे (वडखा) -१ कोटी ७० लाख रुपये

मैनाबाई पंडित काकडे (वडखा) -६४ लाख रुपये

एकनाथ रंगनाथ काकडे (वडखा) -१ कोटी ५० लाख रुपये

टॅग्स :Bankscam