दप्तराचे ओझे कायमच. बळावताहेत पाठीचे, मणक्‍याचे आजार

संदीप लांडगे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

शासनाने विद्यार्थ्यांचा पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी संशोधन करून 2015 मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या; मात्र खरोखरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले नाही.

औरंगाबाद - शासनच नव्हे न्यायालयानेही दप्तराच्या ओझ्याबाबत निर्देश दिलेले आहेत. असे असताना दप्तराचे ओझे कमी व्हायला तयार नाही. अगदी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट आढळून आल्याचे वास्तव "सकाळ'च्या पाहणीतून समोर आले. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र नव्या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे "जैसे थे' आहे. या ओझ्याने मुले वाकलेले दिसत आहेत. 

शासनाने विद्यार्थ्यांचा पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी संशोधन करून 2015 मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या; मात्र खरोखरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले का? याची पाहणी शासनाकडून शाळांमध्ये नियमितपणे झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत; परंतु अनेक पालक याबाबत जागरूक नसल्याने विद्यार्थ्यांचे दप्तर जड होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. 
 
मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांचा गोंधळ 
दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे मुख्याध्यापक सांगतात. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवून अहवाल मागवला जात असल्याचे अधिकारी सांगतात; परंतु अधिकारी शाळांमध्ये जाऊन पाहणी करण्याऐवजी कागदोपत्री अहवाल सादर करीत असल्याचे, शिक्षक खासगीत सांगतात. 
 
पाठीचे, मणक्‍याचे आजार 
लहान वयात जड दप्तरे वाहून नेणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतर पाठीचे, मणक्‍याचे आजार जडतात हे वैद्यकीय अहवालातून उघड झाले असताना विद्यार्थ्यांना हे ओझे वाहावे लागत आहे. शहरातील विद्यार्थ्यांची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. लहान वयातच हल्ली मुलांना अनेक त्रास होतात याची दखल घेतली पाहिजे. "आम्हाला दप्तराच्या ओझ्याचा त्रास होतो' अशी तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. 
 
पाठीवरचे थोडे ओझे हातात 
शालेय दप्तरात वह्या-पुस्तके, कंपास, वर्कबूक व सोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली असते. हे ओझे हलके करण्यासाठी मुलांना डबा आणि पाण्याची बाटली बास्केटमध्ये घेऊन येण्याचा आदेश काही शाळांनी दिला आहे. यामुळे पाठीवरचे थोडे ओझे हातात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School bags half the weight of children