घुशींनी पोखरली शाळा

सुशांत सांगवे 
रविवार, 20 जानेवारी 2019

लातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी उलटी स्थिती पाहायला मिळत आहे. शाळेतील वर्ग खोली घुशींनी पोखरली आहे. सेवक नसल्याने चक्क शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरच शाळेची, शाळेतील स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे आपल्याच शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बाभळगाव रस्त्यावरील राजीवनगर भागात महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ ची सकाळने पाहणी केली. तेव्हा शाळेतील दुरवस्था समोर आली; पण येथील शिक्षकांनी वारंवार पत्रव्यवहार करून पालिकेच्या प्रशासनाचे येथील दुरवस्थेकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला; पण एकाही पत्राची दखल घेतली गेली नाही. प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

शाळेच्या दोन वर्ग खोल्या घुशींनी पोखरल्या आहेत. प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शिक्षकांनी स्वत: एका वर्गखोलीची डागडुजी केली; पण दुसरी वर्गखोली अद्याप घुशींच्या ताब्यात आहे. त्यामुळे मुलेही भीतीच्या सावटाखालीच असतात. शाळेला सेवक नसल्यामुळे मुलांना आणि शिक्षकांना मिळून शाळा, शाळेचा परिसर आणि शाळेच्या स्वच्छतागृहाची दररोज साफसफाई करावी लागते.

 तरीदेखील प्रशासनाने शाळेकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याचीही चांगली सोय नाही. तोट्या आहेत; पण पाणीच नाही, असे आश्‍चर्यकारक चित्र शाळेत पाहायला मिळाले.

बाभळगाव रस्त्यावर ही शाळा आहे. शाळेसमोरच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे जीव धोक्‍यात घालून मुलांना रस्ता ओलांडून शाळेत जावे लागत आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सेवक नेमला जावा, असेही काही पालकांनी यावेळी सांगितले.

Web Title: school class room damage due to rat