विक्रमी विद्यार्थी संख्येमुळे पारूनगरची शाळा दोन सत्रात

विकास गाढवे
शनिवार, 30 जून 2018

लातूर : जिल्हा परिषदेची जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा म्हणून लौकिक असलेली मुरूड (ता. लातूर) येथील पारूनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमवारपासून (ता. 2 जूलै) दोन सत्रात भरणार आहे. शाळेची पहिली ते सातवीची विद्यार्थी संख्या यंदा साडेतेराशेच्या वर गेली आहे. या विक्रमी विद्यार्थी संख्येपुढे वर्गखोल्याची संख्या कमी पडत असल्याने शाळेने हा निर्णय घेतला असून जिल्हा परिषदेनेही त्यासाठी मान्यता दिली आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडत असताना दोन सत्रात भरणारी पारूनगर ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा ठरली आहे. 

सकाळच्या सत्रात पाचवी ते सातवी तर दुपारच्या सत्रात पहिली ते चौथीचे वर्ग भरणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक दिलीप जाधव यांनी दिली. सन 2004 मध्ये मुरूडच्या पारूनगर भागातील पाण्याच्या टाकीखाली चोवीस विद्यार्थी संख्येने ही शाळा सुरू झाली. त्यानंतर या शाळेचे रूपांत्तर एक प्रयोग म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सेमी इंग्रजी शाळेत केले. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला व दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढतच गेली. विद्याथी संख्येसोबत शिक्षक तसेच वर्गखोल्याची संख्याही वाढली. यंदा एकूण विद्यार्थी संख्या एक हजार 350 झाली आहे. 

गेल्यावर्षीच विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या कमी पडत होत्या. यामुळे जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे यांनी नवीन तीन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. लवकरच या खोल्यांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या स्थितीत आता नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी शाळा परिसरात जागा उपलब्ध नाही. नवीन खोल्यांची उपलब्धता गृहित धरूनही विद्यार्थी संख्येच्या तुलनेत खोल्या कमी पडून एका वर्गात दाटीवाटीने विद्यार्थी बसू लागले होते. यावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय पहाता शाळा दोन सत्रात सुरू करण्याचा ठराव शालेय व्यवस्थापन समितीने घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य नाडे यांनी पाठपुरावा केला.

शिक्षण समितीचे सभापती उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी मान्यता दिल्यानंतर सोमवारपासून शाळा दोन सत्रात भरण्यास सुरूवात होणार आहे. खासगी शाळांमुळे एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना पारूनगरच्या शाळेत दरवर्षी वाढणारी विद्यार्थी संख्या शिक्षकांनी गुणवत्तेसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

Web Title: the school of Parunagar in two sessions