शाळेचा तास भरला सीईओंच्या दालनात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील जिल्हा परिषद शाळेमधे शिक्षकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी सोमवारी (ता.२२) जिल्हा परिषदेचे  मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवली.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील तपोवन येथील जिल्हा परिषद शाळेमधे शिक्षकाची नियुक्ती करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी सोमवारी (ता.२२) जिल्हा परिषदेचे  मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवली. 

तपोवन येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा असून तेवीस विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी पुर्वी दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र जिल्हा परिषदेने एका शिक्षकाची इतरत्र प्रतिनियुक्ती केली आहे. त्यामुळे एकाच शिक्षकावर शाळा सुरु आहे. संबंधीत शिक्षक बैठका आणि टपालाच्या इतर कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान  होत आहे. म्हणुन या ठिकाणी तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. मात्र या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. 

दरम्यान, आज सकाळी गावकरी आज शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेवर आणले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरूनच विद्यार्थ्यांनी शिक्षक देण्यासाठी घोषणा दिल्या. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या दालनात  शाळा भरवली. यावेळी डॉ. तुम्मोड यांच्याकडे सविस्तर मागण्या मांडल्या. पुढील दोन दिवसांत याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी दालनातून दुपारी एक  वाजता काढता पाय घेतला. 

अधिकाऱ्यांकडून वड्याचे तेल वांग्यावर
यावेळी अधिकाऱ्यांना आणखी एक शिक्षक आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र दालनातच शाळा भरल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपध्दतीवर संतप्त झालेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश का दिले नाही असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उपस्थित करून आग पाखड केली. अधिकाऱ्यांचा हा प्रकार म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढल्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school was practiced in CEO's room