शाळेतील वायफाय जोडणी फक्त कागदावर

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये वायफाय किंवा इंटरनेट जोडणीच नाही. त्यामुळे सध्या ही योजना कागदावरच असून ऍपद्वारे माहिती देण्याचा उपक्रम पूर्णपणे बारगळा आहे; तसेच बहुतांश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या धड्याच्या शेवटी असलेला "क्‍यूआर कोड' (द्रूत प्रतिसाद कोड, हा एक प्रकारचा मॅट्रिक्स बारकोड किंवा द्विमितीय कोडींगचे ट्रेडमार्क) का दिला आहे, हेच माहिती नसल्याचे वास्तव आहे. 

ग्रामीण किंवा शहरी भागातील अनेक जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये फक्त नावालाच संगणक कक्ष तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर कधीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला जात नाही. वायफाय, इंटरनेटद्वारे क्‍यूआर कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांना पुस्तकातील धड्याबाबतची माहिती देण्यासाठी; तसेच बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनाही तंत्रस्नेही व्हावे म्हणून नव्या धोरणानुसार शिक्षकांना शाळेत मोबाईल गरजेचा झाला आहे; परंतु शिक्षक या मोबाईलचा वापर शालेय अभ्यासक्रमासाठी कमी आणि सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह राहण्यासाठीच जास्त प्रमाणात करीत असल्याचे चित्र आहे. 
 
क्‍यूआर कोड 
पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याच्या शेवटी "क्‍यूआर कोड' दिला आहे. "दीक्षा' ऍपद्वारे तो स्कॅन केल्यानंतर त्या-त्या विषयाच्या विविध लिंक ओपन होऊन पुस्तकाव्यतिरिक्त सर्व माहिती उपलब्ध होते. शिक्षकांना संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आणि अतिरिक्त माहिती मिळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास उपयोगी ठरणार होते. हा क्‍यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करावा लागत होता. मात्र, अनेक शिक्षक अद्याप कोड स्कॅनरबाबत अनभिज्ञ आहेत. 

असाही गैरसमज 
आधुनिक युगात मुलांच्या पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी डिजिटल शाळा करण्याचा शासनाचा उद्देश होता. वायफाय, इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाशी जोडले जाऊन पारंपरिक खडू-फळ्याऐवजी प्रोजेक्‍टर, एलईडी स्क्रीन, मोबाईल ऍप, व्हाईट बोर्ड, ग्रीनबोर्ड, ग्राफबोर्ड घेऊन विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिक्षण देण्यासाठी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला. मात्र, पाठ्यपुस्तकांऐवजी टॅब, कॉम्प्युटर, प्रोजेक्‍टर वापरला की शाळा डिजिटल होते असा गैरसमज शिक्षक आणि पालकांमध्ये पसरला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये पायाभूत सुविधांचीच वानवा आहे; तेथे डिजिटल शाळांची अंमलबजावणी कशी होणार? कारण, शिक्षकांना शिक्षणात होणारे नवीन बदल समाजावून घेणे आणि ते आत्मसात करणे अंगवळणी पडत नाही. बहुतांश शिक्षकांना पारंपरिक पद्धतीने शिकविण्याची सवय लागली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानानुसार शिक्षणात होणारे बदल त्यांना नकोशे झाले आहेत. 

अनेक शाळांत संगणकच नाहीत 
डिजिटल शाळा करण्यासाठी शाळेत संगणक गरजेचे असते. संगणक असल्यास इंटरनेट सुविधा लागते. या दोन्ही सुविधा असल्यास शाळेत वीजजोडणी लागते; परंतु जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत, ज्या ठिकाणी ना इंटरनेट आहे, नाही वीजजोडणी. अनेक शाळांमध्ये वीजजोडणी आहे; मात्र थकीत बिलामुळे वीज तोडलेली आहे. ज्या शाळांमध्ये सर्व सुविधा आहेत त्या शाळांमध्ये याबाबत शिक्षक उदासीन आहेत. 

घरी गेल्यावर बघा! 
प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या धड्याच्या शेवटी क्‍यूआर कोड दिलेला आहे. याबाबत विविध शाळांतील विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की शिक्षक शिकवताना या क्‍यूआर कोडचा कधीही वापर करीत नाहीत. शाळेतील शिक्षकांना याबाबत विचारले असता, घरी गेल्यावर पालकांच्या मोबाईलमध्ये हा कोड स्कॅन करून पाहा, असे सांगून आपले हात झटकतात; परंतु हा क्‍यूआर कोड स्कॅन करण्यासाठी शाळेचा युडायस नंबर, शाळा क्रमांक अशा गोष्टींची आवशकता लागते. पालकांना या गोष्टींबद्दल माहिती नसते. 


2017-18 पासून शालेय पाठ्यपुस्तकात क्‍यूआर कोड प्रत्येक धड्यासाठी देण्यात आला होता. मुलांना तंत्रशुद्ध पद्धतीने व पाठाच्या संबंधित माहिती या क्‍यूआर कोडमध्ये दिली होती. मात्र, सध्या ऍपमध्ये कोड स्कॅन होत नाही, शिवाय, ऍपही ऍक्‍टिव्ह नाही. बहुतांश कोड स्कॅन केल्यानंतरही पाठाबद्दल माहिती येतच नाही. 
- प्रदीप विखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघटना 


प्रत्येक पुस्तकात क्‍यूआर कोड दिला आहे. मात्र, हा कोड का दिला आहे, हे माहिती नाही. शिक्षकांना विचारले असता, पाठाची माहिती आहे, असे सांगतात; प, प्रत्यक्षात कधीही मोबाईलद्वारे दाखविले नाही. 
- योगेश गायकवाड, विद्यार्थी, इयत्ता नववी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com