बीड जिल्ह्यातील 221 वस्तीशाळांना इमारत नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

केज : बीड जिल्ह्यातील 221 वस्तीशाळांना पक्की इमारतच नसल्यामुळे पत्रे आणि कुडांच्या वर्गखोल्यांत या शाळा भरत आहेत. सध्या पारा 12 अंशांपर्यंत घसरला असून, थंड पडणाऱ्या पत्र्यांमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना हुडहुडी भरत आहे. परिणामी, सध्या या विद्यार्थ्यांचे वर्ग बाहेर उन्हात भरत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अनेक तांडा-बेड्यांची वस्ती गावापासून दूर आहे. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने 2002 मध्ये सर्व शिक्षा अभियानातून वस्तीशाळा सुरू करण्यास मान्यता दिली. पुढे 2008 मध्ये त्यातील काही अनावश्‍यक शाळा शिक्षण विभागाने बंद करून उर्वरित शाळांचे प्राथमिक शाळेत रूपांतर केले. त्यानंतर 2013 मध्ये बृहत्‌ आराखड्यातून जिल्ह्यात 221; तर केज तालुक्‍यात 28 वस्तीशाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. मात्र, तीन वर्षांपासून या शाळा इमारतीविनाच भरत आहेत. दरम्यान, शाळेतील शिक्षक आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती यांनी कुठे पत्रे तर कुठे कुडाच्या भिंती उभारून वर्गखोल्या तयार केल्या. पण, आता कडाक्‍याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांना वर्गांत बसणे अवघड जात आहे.

उन्हाळ्यात बसतात चटके
या वर्गखोल्यांचे शेड उन्हाळ्यामध्ये तापतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चटके बसतात; तर पावसाळ्यात जमिनीला ओल फुटते. शिवाय पत्रे आणि कुडाच्या या शेडमधून पाणी गळते. त्यामुळे दप्तरे, वह्या-पुस्तके भिजतात.

Web Title: schools don't have buildings