निकालात उडाली दैना अन् विद्यार्थी ऍडमीशनच घेईना !

संभाजी रा. देशमुख
गुरुवार, 4 जुलै 2019

लातूर शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी वसतीगृहांमध्येही अद्याप केवळ पन्नास टक्केच जागा भरल्या असून विद्यार्थी गेला कुठे? असे म्हणण्याची वेळ संस्थाचालकांवर आली आहे.

अद्याप केवळ पन्नास टक्केच प्रवेश; शहरातील कनिष्ठ महाविद्यालये, क्लासेस, वसतीगृहे विद्यार्थांच्या प्रतिक्षेत

लातूर : दहावीचा बोर्डाचा निकाल जाहिर होऊन एक महिना उलटला तरी अद्यापही शहरातील नामांकीत विज्ञान महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. तर बाहेरून लातूर शहरात येणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत पन्नास टक्के घट झाल्याचे चित्र आहे. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी वसतीगृहांमध्येही अद्याप केवळ पन्नास टक्केच जागा भरल्या असून विद्यार्थी गेला कुठे? असे म्हणण्याची वेळ संस्थाचालकांवर आली आहे.

यंदा आंतर्गत गुण रद्द केल्यामुळे दहावीच्या बोर्डाचा निकाल कमी लागला. त्यात साठ ते 90 टक्क्यांदरम्यान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड घटली. त्याचबरोबर गेली दोन हंगाम खरीप आणि रबी कोरडेच गेले. या सर्वांचा परिणाम म्हणून शहराकडे येणाऱया विद्यार्थ्यांची संख्येत पन्नास टक्के घट दिसते आहे, अशी प्रतिक्रिया जयक्रांती महाविद्यालयाचे विज्ञान विभाग समन्वयक प्रा. विजयकुमार मोरे यांनी व्यक्ती केली. तर शहरात मुला-मुलींसाठी किमान तीनशे वसतीगृह सध्या कार्यरत आहेत. पन्नास विद्यार्थांची क्षमता असलेल्या वसतीगृहात सध्या 22 ते 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. शहरातील एक-दोन वसतीगृहे सोडली तर इतर वसतीगृहात असेच चित्र आहे, अशी माहिती वसतीगृहचालक प्रदीप पवार यांनी दिली. यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अचानक तुटवडा जाणवायला लागल्यामुळे लातूर शहरातील नामांकीत संस्थांचालकांना धक्का बसला आहे. प्रवेशात एकदम पन्नास टक्के घट झाल्याने पुढील सर्वच गणिते बदलली आहेत. खासगी प्राध्यापकांची कपात करावी की नाही, याद्विधा मनस्थितीत संस्थाचालक आहेत, अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीहरी लोमटे यांनी दिली.

तर शिकवणीचालकांनाही विद्यार्थ्यांचा तुटवडा जाणवतो आहे. निकालावेळी खासगी क्लासेसनी प्रचंड प्रसिद्धी करूनही प्रवेशात घट आहे. ज्यांच्याकडे दीडहजार विद्यार्थी असत, त्यांच्याकडे आतापर्यंत साडेसहाशेच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. हीच परिस्थिती इतर क्लासेसवाल्यांची आहे, अशी प्रतिक्रिया प्रा. सचिन म्हेत्रे यांनी दिली आहे.

यंदा निकालात झालेली घट, सतत दोन हंगामाचा दुष्काळ आणि त्यात वैद्यकीय प्रवेशासाठी सत्तर-तीस प्रमाणामुळे लातूरकडे येणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शहरातील शैक्षणिक संस्था, क्लासेस, वसतीगृह आदी संस्थांवर प्रकर्षाने जाणवतो आहे.
-प्रा. विजयकुमार मोरे, विज्ञान विभाग समन्वयक, जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालय, लातूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Science Collages Waiting for the students at latur