जागावाटपाचा जुना फॉर्म्युला भाजपला अमान्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप आणि शिवेसना नेतृत्वाने स्थानिक पातळीवर अधिकार दिल्याने दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एक बैठक घेण्यात आली; मात्र वर्ष 2012 मधील 24-36 चा फार्म्युला भाजपला अमान्य असून पक्षाची शक्ती वाढल्याने त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. युती आणि जागावाटपासाठी शनिवारी बैठक होण्याची शक्‍यता आहे.

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप आणि शिवेसना नेतृत्वाने स्थानिक पातळीवर अधिकार दिल्याने दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एक बैठक घेण्यात आली; मात्र वर्ष 2012 मधील 24-36 चा फार्म्युला भाजपला अमान्य असून पक्षाची शक्ती वाढल्याने त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. युती आणि जागावाटपासाठी शनिवारी बैठक होण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेना-भाजपची रणनीती आहे. मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांना युती आवश्‍यक आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याने दोन्ही पक्ष पेचात सापडले आहेत. भाजपची शक्ती वाढल्याने बहुतांश कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर शिवसेनेकडून युती करण्यासाठी सकारात्मकता दाखविण्यात आली आहे. वर्ष 2012 मध्ये जिल्हा परिषदेचे 60 गट होते. युतीत भाजपच्या वाट्याला 24, तर शिवसेनेच्या वाट्याला 36 जागा आल्या होत्या. यामध्ये भाजपचा फक्त 6 जागी विजय झाला, तर शिवसेनेला सर्वाधिक 17 जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचा पैठण, गंगापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष विजयी झालेला आहे. शिवाय अनेक नेत्यांनी प्रवेश केल्याने पक्षाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे युती करताना भाजपला सन्मानपूर्वक जागा हव्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 62 गटांपैकी भाजपने पन्नास टक्के गटांवर दावा सांगितला आहे. अर्ध्या जागांचा फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य आहे. निवडणुकीत जागा कमी मिळाल्या तर अध्यक्षपदापासून पक्षाला वंचित राहावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे आता युती आणि जागावाटपासाठी शनिवारी बैठक होणार आहे.

युती झाली तर अनेकांची बंडखोरी
शिवसेना आणि भाजपकडून अनेक इच्छुकांनी लढण्याची तयारी दर्शविली आहे. सद्यःस्थितीत दोन्ही पक्षांकडे एक गटात अनेकजण इच्छुक आहे. दोन्ही पक्षांकडे 62 गटांत इच्छुक उमेदवार आहेत. आता नवीन सूत्रानुसार युती झाली तर काही अनेक इच्छुकांना सदस्य होण्याच्या इच्छेवर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुक स्वबळावर लढावे असे खासगीत सांगत आहेत. युती झाली तर यामध्ये अनेक तगडे इच्छुक दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेमधील बंडखोरांना मनसे तसेच इतर पक्षांकडून तिकीट मिळू शकते. या सर्वांमध्ये युतीत दोन्ही पक्षांना बंडखोरीची लागण होऊ शकते.

युती, जागावाटपाचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आलेले आहेत. आमची एक बैठक अगोदर झालेली आहे. आम्हाला जुना 24-36 फॉर्म्युला अमान्य आहे. जिल्ह्यात आमची शक्ती वाढली आहे. आमचे राज्यात सरकार; तसेच आमदार आहेत. त्यामुळे युती आणि जागावाटप या सन्मानाने व्हाव्यात.
- एकनाथ जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष, ग्रामीण

युती आणि जागावाटपासाठी आमची एकदा बैठक झालेली आहे. आता पुन्हा शनिवारी बैठक होईल. यामध्ये जागावाटपांचा नवीन फार्म्युला ठरेल. आमची युती करण्याचीही तयारी आहे आणि सर्वच्या सर्व 62 जागा लढण्याचीही तयारी आहे.
- अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Web Title: seat distribution old formula reject by bjp