एसईबीसीसाठी पैसे मागणाऱ्या दलालांवर गुन्हे दाखल होणार 

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

एसईबीसीसाठी द्या 68 रुपये 
अध्यादेश निघाल्यानंतर एसईबीसीसाठी विद्यार्थी विविध ठिकाणांहून कागदपत्रे काढत आहेत. सर्व कागदपत्रे सोबत घेऊन सेतूमधून एसईबीसी काढण्यासाठी अर्जासाठी 12 रुपये, तर प्रमाणपत्रासाठी 56 रुपये असे एकूण 68 रुपयेच निर्धारित शुल्क आकारण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या एसईबीसी (सामाजिक, आर्थिक मागास) प्रमाणपत्रासाठी "सेतू'मध्ये दलाली करणाऱ्यांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सोमवारी (ता. 17) "सकाळ'ने "एसईबीसीसाठी चारशेचा रेट' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने याची तातडीने गंभीर दखल घेत दलालांवर फौजदारी गुन्हे नोंदवा, असे आदेशच उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

मोठ्या संघर्षातून आरक्षण मिळविल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सध्या सेतू सुविधा केंद्रात एसईबीसी प्रमाणपत्र काढण्यासाठी दाखल होत आहेत; मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी मोठ्या प्रमाणात दलाल पुढे आले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या "सेतू'मध्ये गेल्या चार दिवसांपासून कुणी दाखल झाले, की "काय हवंयं सांगा, लगेच मिळवून देतो', असे सांगत अक्षरश: गराडा घालत लुटण्याचा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे. हा सर्व प्रकार "सकाळ'ने समोर आणताच प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांना आपल्या दालनात बोलावत सेतूमध्ये आढळून येणाऱ्या दलालांवर थेट फौजदारी गुन्हेच दाखल करा, असे आदेश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत येथे येणाऱ्यांना लुबाडण्याचे काम होता कामा नये, तसे कुणी करीत असेल तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

प्रमाणपत्रांसाठी पैसे देणे टाळा 
सेतू सुविधा केंद्रातील सर्व कामकाज ऑनलाइन झालेले आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, सामान्य नागरिकांनी सर्व व्यवहार ऑनलाइनच करावेत. त्यासाठी निर्धारित शुल्काव्यतिरिक्‍त पैसे देण्याची गरज नाही. कुणी पैसे मागत असल्यास त्याची प्रशासनाकडे तक्रार करा. 
- संजीव जाधवर, निवासी उपजिल्हाधिकारी, औरंगाबाद. 

एसईबीसीसाठी द्या 68 रुपये 
अध्यादेश निघाल्यानंतर एसईबीसीसाठी विद्यार्थी विविध ठिकाणांहून कागदपत्रे काढत आहेत. सर्व कागदपत्रे सोबत घेऊन सेतूमधून एसईबीसी काढण्यासाठी अर्जासाठी 12 रुपये, तर प्रमाणपत्रासाठी 56 रुपये असे एकूण 68 रुपयेच निर्धारित शुल्क आकारण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: SEBC caste certificate issue in Aurangabad