अकरावी प्रवेशाची उद्या जाहीर होणार दुसरी फेरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशप्रक्रियेची केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी (ता.22) सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे.

औरंगाबाद -  सध्या अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशप्रक्रियेची केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी (ता.22) सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 23 ते 25 जुलैदरम्यान प्रवेश घेता येतील. 

पुणे, मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यंदा प्रवेशासाठी 110 महाविद्यालयांत 29 हजार 100 एवढी प्रवेशक्षमता आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी 18 जूनपासून वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आतापर्यंत 16 हजार 484 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

पहिली गुणवत्ता यादी 12 जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 11 हजार 703 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली होती. त्यात सात हजार 922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर 17 आणि 18 जुलै असे दोन दिवस विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. 

22 जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना 23 ते 25 जुलैदरम्यान प्रवेशनिश्‍चिती करावी लागेल. 25 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second round will be announced tomorrow