दुचाकीवरून पडला, खांब पोटात घुसला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

महापालिकेच्या अधर्वट कामाचा बळी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौकात गेला. धावती दुचाकी घसरल्यानंतर दुभाजकावर आदळली. दुभाजकाजवळील अर्धवट कापलेला खांब पोटात घुसल्याने पहारेकरी जागीच ठार झाला. हा गंभीर अपघात मंगळवारी (ता. 19) दुपारी दीडच्या सुमारास घडला. 

औरंगाबाद - महापालिकेच्या अधर्वट कामाचा बळी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौकात गेला. धावती दुचाकी घसरल्यानंतर दुभाजकावर आदळली. दुभाजकाजवळील अर्धवट कापलेला खांब पोटात घुसल्याने पहारेकरी जागीच ठार झाला. हा गंभीर अपघात मंगळवारी (ता. 19) दुपारी दीडच्या सुमारास घडला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बालाजी परसराम दिगूळकर (वय 40, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. ते "एमजीएम'मध्ये पहारेकरी होते. अंबिकानगरातून ते दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून सेव्हनहिलकडे जाण्यासाठी निघाले होते. सिडको उड्डाणपूल पार केल्यानंतर अग्रसेन चौकात त्यांची दुचाकी स्लीप झाली. यानंतर तोल जाऊन ते दुभाजकावर आदळले व दुचाकी विरुद्ध बाजूने पुढे गेली.

दुभाजकावर आदळताच ते अर्धवट कापलेल्या खांब्यावर पडले. खांबच पोटात घुसल्याने खोलवर जखम होऊन दिगूळकर रक्तबंबाळ झाले. या अपघातात त्यांचे दातही पडले. घटनेनंतर दिगूळकर यांना नागरिकांनी व पोलिसांनी लगेचच एमजीएम रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. 
 

नाहक गेला जीव 
जालना रस्त्यावर बहुतांश ठिकाणी बारीक रेती असून या रेतीमुळे अनेक दुचाकीस्वार घसरतात. अग्रसेन चौकाजवळ दुभाजकात उभारलेला खांब पडायला आला म्हणून काही दिवसांपूर्वीच तो अर्धवट कापण्यात आला. पूर्ण कापला असता तर खांब पोटात घुसला नसता; परंतु महापालिकेच्या अर्धवट कामामुळे बालाजी दिगूळकर यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. 

Web Title: Security guard killed in accident