वाचा अन..बघाही चोर कसे हिसकावतात मंगळसुत्र

मनोज साखरे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

  • मंगळसुत्र हिसकावताना चोर सीसीटीव्हीत कैद 
  • आधी विचारला पत्ता मग हिसकावले मंगळसुत्र 
  • पाळत ठेवून साधला चोरांनी डाव 
  • विनाक्रमांकाच्या दुचाकीचा केला वापर 

औरंगाबाद - दुचाकीवर थांबलेल्या दोघांपैकी एकाने उतरून रस्त्याने जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारला. लक्ष विचलित करून झटक्‍यात महिलेचे 18 ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. ही घटना जवाहरनगर येथील महापालिका शाळेजवळ घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अनिता त्र्यंबक देशमुख (वय 48, रा. वात्सल्य नर्सिंग होमजवळ, उत्तमनगर, जवाहरनगर) या सोमवारी दुपारी शास्त्रीनगर येथील त्यांच्या भावजयीकडे गेल्या होत्या. भावजयीला भेटून पुन्हा त्या घराकडे पायीच निघाल्या. त्यावेळी त्यांचा पाठलाग दुचाकीस्वार दोघे करीत होते. त्या महापालिकेच्या शाळेजवळ येताच तेथील चौकात ते थांबले. दुचाकीवर मागे बसलेला एकजण खाली उतरला. त्याच्याजवळ एक कागद पुढे करीत त्याने श्रीमती देशमुख यांना पत्ता विचारला.

अनिता देशमुख या कागद हाती घेऊन पत्ता वाचू लागताच तरुणाने त्यांचे मंगळसूत्र हिसकावले आणि लगेच साथीदारासाहेब दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेने श्रीमती देशमुख गांगारून गेल्या. त्यांनी कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी लगेच जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

घटना सीसीटीव्हीत 
दुचाकीस्वार चोर मंगळसूत्र हिसकावताना तेथील एका हाउसिंग सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाले. अठ्ठावीशीतील दोघेही विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आल्याचे दिसते. त्यातील एकाने दाढी वाढविलेली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून, चोरांचा शोध सुरू आहे. 
हेही वाचा : पवारसाहेब आयसीसीचे अध्यक्ष होते, हे गडकरी विसरले 
हेही वाचा : भाजपला आणखी एका पक्षाचा रामराम, महाविकास आघाडीची संख्या झाली.... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See how the thieves shout mangalsutra