पावसाअभावी खरेदी नसल्याने कृषि कंपनीला बियाणे परत

बाळासाहेब लोणे
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

यंदा बियाणे उपलब्ध असलीतरी पावसाने हुलकावणी दिल्याने बियाण्यांची खरेदी थंडावली आहे. पन्नास टक्के बियाणे कंपनीला परत देण्यात आली आहेत. काही ठिकाणी पाऊस नसल्याने पेरण्याही झालेल्या नाहीत किंवा काही ठिकाणी झालेल्या पेरण्या फुकट जातील, अशी शक्यता आहे.

- संदेश गंगवाल (मुख्य बियाणे वितरक, अरिहंत सेवा केंद्र गंगापुर)

गंगापूर : पाऊस नसल्याने कृषि सेवा केंद्रातील पन्नास टक्के बियाणे कंपनीला परत गेले असून यात कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, तूर बियाण्याचा समावेश आहे. पुरेशी बियाणे उपलब्ध नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर बियाण्यांची ओरड झाली. बियाणे उपलब्ध झाली मात्र, पाऊसच पडला नसल्याने खरीप हंगामातील पेरणी रखडली. एक-दोन नाहीतर तब्बल अडीच महिने पावसाने दडी मारली.

कंपनींने कृषि सेवा केंद्रातील दुकानांना दुकानात पडून असलेले बियाणे परत देण्याची डेडलाइन दिली. त्यानुसार कृषि सेवा केंद्रातील दुकानदारांनी मंगळवारी (ता. सात) अखेरच्या दिवशी बियाणे कंपनीला परत दिले. तालुक्यात एकूण एक लाख पाच हजार हेक्टर लागवडी क्षेत्र असून आजवर ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र, अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी पुन्हा लागवड करण्यास धजात नसल्याने कृषि सेवा केंद्रातील खरेदी थंडावली आहे. भेंडाळा, मालुंजा, नरसापूर, सरांगपुर, कनकोरी भागात पाऊसच नसल्याने वीस हजार हेक्टरवर पेरणीच होऊ शकली नाही.

शेतकरी सावध 

गेल्यावर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या संकटामुळे यंदा कपाशीच्या पेऱ्यात घट होईल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यंदा कापूस बियाण्यांची मागणी कमी झाली आहे. पाऊस लांबल्याने मुगाच्या पेऱ्यावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सध्या शेतकरी अत्यंत सावधपणे निर्णय घेत आहेत.

पीक पद्धतीही लहरी 

खरीप हंगामात आता शेतकऱ्यांना सोयाबीन व मका या पिकांशिवाय दुसरा पर्याय नाही. तुरीखालील क्षेत्र कमी झाले. मागील वर्षी सरकारी खरेदी केंद्रावर तूर विकताना नाकी नऊ आले. कमी किमतीत बाजारात तूर विकली लागली. एकूणच लहरी पावसावर पीक पद्धतीही लहरी बनली आहे. त्यातून बियाणाच्या बाजारातही खरेदी विक्रीचा उठाव हा लहरी झाला आहे.

Web Title: Seed back to the agricultural company due to lack of rain