उमेदवारीवरून सेना- भाजपा असंतुष्ट कार्यकर्त्यांनी औशात रोखला महामार्ग

जलील पठाण
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पालकमंत्री निलंगेकरांनी मागितला एक दिवसाचा वेळ... भूमीपुत्रालाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न 
करण्याचे दिले आश्वासन


 

औसा(जि. लातूर) ः गेल्या अनेक वर्षांपासून औसा मतदार संघ युतीमध्ये सेनेकडे राहिला आहे. सेनेकडे असणारा हा मतदारसंघ यावेळी भाजपकडे देण्यात आला आहे. येथून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवारांना उमेदवारी मिळाल्याचे वृत्त समजताच भाजपाच्या एका गटात अस्वस्थता पसरली तर दुसरीकडे सेनेने निवडणुकीसाठी सगळी तयारी केल्यावर अचानक हा मतदारसंघ भाजपला दिल्याने सेनेचे माजी आमदार दिनकर माने चांगलेच खवळले.

भाजपच्या आणि सेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या मातीतला आणि भूमीपुत्रच उमेदवार द्यावा या मागणीसाठी नागपूर- रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग तीन तास रोखून धरला. पालकमंत्री संभाजी पाटील यांची गाडीही या आंदोलनकर्त्यांनी अडवली. 
औसा विधानसभा मतदारसंघ हा सेनेकडे असल्याने सेनेचे माजी आमदार दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी हे गेल्या अनेक महिन्यापासून निवडणुकीची तयारी करीत होते.

दुसरीकडे भाजपचे पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष किरण उटगे हेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार होते. मात्र या सगळ्यावर मात करीत अभिमन्यू पवारांनी आपले वर्चस्व दाखवीत सेनेकडून हा मतदारसंघ भाजपला सोडवून घेतला आणि तिकिट ही मिळवले यामुळे दिनकर माने आणि किरण उटगे गट चांगलेच आक्रमक झाले. बुधवारी (ता.२) सकाळी उटगे समर्थक आणि माने समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी जमले व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात येथील अप्रोचरोड चौकात ठिय्या मांडला.

या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी हा भूमीपुत्रच असावा अशी मागणी करीत सुमारे तीन तास रस्ता रोखून धरला. यामध्ये पालकमंत्र्यांची गाडीही आंदोलकांनी अडवून ठेवली. शेवटी पालकमंत्री खाली उतरून आंदोनकर्त्यांची भेट घेऊन या मातीतला आणि ज्याने या भागात पक्षवाढीसाठी झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन काम केले आहे त्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठीकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.

सेनेचा किंवा भाजपाचा, पण भुमीपुत्रच
यावेळी सेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी सांगितले की, उमेदवार भाजपचा असो की सेनेचा मात्र तो या मातीतला आणि आपला असला पाहिजे. आमच्यावर लादलेला उमेदवार चालणार नाही. या भागातील लोकांसाठी काम केलेला आणि नाळ जोडलेल्या उमेदवारालाच संधी मिळावी, यासाठी रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sena- BJP dissatisfied workers blocked highway