‘या’ शहरातील ज्येष्ठांचा असाही जिव्हाळा

गणेश पांडे  
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

0- सहकाऱ्यांचा जन्मोत्सव साजरा करुन आनंद द्विगुणित
0- सेवानिवृत्तांनी एकत्र पेन्शनर भजनी मंडळाची स्थापना

0- ज्येष्ठांच्या या उपक्रमाचे होत आहे सर्वत्र कौतुक

परभणी : वार्धक्य हे कुणालाही नको असते. तरीही ते प्रत्येकास स्विकारावेच लागते. पण त्यातूनही आलेल्या एकाकीपणाला दुर सारून याही जीवनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, विरंगुळा म्हणून अनेक जण काही न काही छंद जोपासत असतात. असाच छंद शहरातील सेवानिवृत्तांनी एकत्र येऊन आपल्या सहकाऱ्यांचा जन्मोत्सव साजरा करून आपला आनंद द्विगुणित करीत आहे. सेवानिवृत्तांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

परभणी शहर हे निवृत्तांचे शहर म्हणून आता पुढे येत आहे. कारण या शहरात निवृत्त व्यक्तीची संख्या जास्त आहे. त्यामुळे सकाळ व संध्याकाळ ही सेवानिवृत्त मंडळी कुठे ना कुठे गप्पा मारतांना दृष्टीस पडतात. परंतू शहरातील काही सेवानिवृत्तांनी एकत्र येवून पेन्शनर भजनी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळात २५ ते ३० सदस्य आहेत. यातील सर्वच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले व्यक्ती आहेत.

शासकीय सेवेत असतांना कुणी वर्ग दोनच्या हुद्द्यावर काम केले तर कुणी सेवक म्हणून काम केले. कुणी शिक्षक तर कुणी बॅंक अधिकारी राहीलेले आहेत. कुणी तहसीलदार तर कुणी लेखा विभागात काम केलेले आहे. अशा एकना अनेक हुद्यांवरून सेवानिवृत्त झालेल्या या व्यक्ती आहेत. नोकरीत असतांना कधी कुणाची भेटही झाली नसेल; परंतू, आता ही मंडळी दर आठवड्याला एकत्र येतात. दर गुरुवारी एका घरी जाऊन ते भजन सादर करून आपला विरंगुळा जोपासत आहेत. एवढेच नाहीतर, भजनाच्या माध्यमातून  एकमेकांबद्दलचाही जिव्हाळा तेवढाच जपला जातो, हे विशेष आहे.

एकमेकांप्रती जिव्हाळा
विशेष हे आहे की, मंडळातील २५ जणांच्या इत्यंभुत माहितीचे रेकॉर्डही त्यांनी तयार केले आहे. त्यात त्या व्यक्तीची जन्म तारीख आवर्जून घेतली आहे. या मंडळींनी गेल्या दोन वर्षांपासून एक सुंदर उपक्रम राबविला आहे. तोही कुठे खंड पडू न देता. या ग्रुपमधील कुणाचा वाढदिवस असेल तर ही सर्व मंडळी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतात. केवळ हार तुरेच नाही तर चांगला दोन तासाचा हा कार्यक्रम चालत असतो.
 
असे असते कार्यक्रमाचे स्वरूप
ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्या व्यक्तीच्या घरी मंडळातील सर्व सदस्य जातात.  सुरुवातीला सर्वजन मिळून शांतीपाठ म्हणतात. त्यानंतर त्या व्यक्तिच्या घरातील महिलांच्या हाताने औक्षण केले जाते. मग सर्व मिळून वाढदिवसाची गाणी म्हणतात. त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. एवढेच नाहीतर केकही कापला जातो.  
 
सेवानिवृत्ताच्या कुटूंबाला मदत
एखाद्या सेवानिवृत्ताचे निधन झाले तर त्या व्यक्तीच्या कुटूंबाला हे मंडळ मदतीसाठी पुढे येते. त्या व्यक्तीच्या पेन्शन वेतनाची कारवाई पूर्ण करून देणे. कुठे अडचण आली तर अधिकाऱ्यांना भेटून त्या व्यक्तीचे काम करून देण्यातही मंडळातील सदस्य अग्रेसर असतात.

 

उतार वयात आनंद निर्माण व्हावा
आमचे पेन्शनर भजनी मंडळ गेल्या १० वर्षांपासून कार्यान्वीत आहे. परंतू गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा वाढदिवसाचा उपक्रम राबवायला सुरुवात केली. जेणे करून या उपक्रमामुळे व्यक्तीच्या उतार वयात आनंद निर्माण व्हावा हा या मागील मुख्य उद्देश आहे.  
- शरदराव लव्हेकर, अध्यक्ष, पेन्शनर भजनी मंडळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The senior citizens of 'this' city also live