मुल गमावलेल्या मातेने अनुभवली जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता

cole.jpg
cole.jpg

लातूर : झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन केलेल्या वसाहतीत पाच दिवसांपूर्वी एका हौदात पडून नऊ वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक सचिन बंडापल्ले यांच्या मार्फत त्या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला आदेशित केले आहे. या मुलाच्या मातेने जिल्हाधिकाऱय़ांची ही संवेदनशीलता जवळून अनुभवली.

शहरातील अनधिकृत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांसाठी पूर्व भागात गरूड चौकानजीक पूर्वीच्या नगरपालिकेकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे बांधलेल्या वसाहतीजवळ एक मोठा हौदही बांधण्यात आला होता. त्यात नेहमी पाणी साचलेले असते. त्यामध्ये बुडून मंगळवारी त्याच वसाहतीत राहणाऱ्या रितेश संमुखराव (वय ८)  या आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, त्यानंतर या मुलाच्या आईसह काही महिलांनी तसेच या भागातील नगरसेवकांनी गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलनही केले होते. पण महापालिकेच्या प्रशासनाकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ही घटना माध्यमातून समजल्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यातल्या संवेदनशील माणूस जागा झाला. त्यांनी स्थानिक प्रभागाचे नगरसेवक सचिन बंडापल्ले यांच्यामार्फत मृत मुलाची आई राधा संमुखराव व इतर कुटुंबियांना थेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. आठ वर्षाच्या हसत्या-खेळत्या मुलाला गमावलेल्या त्या मातेचं दु:ख त्यांनी समजून घेतले. त्यांचे सांत्वन केले.

प्रशासनाच्या चुकीमुळे उघड्या राहिलेल्या हौदात पडून मुलाचा जीव गेल्यामुळे त्यांनी कुटुंबियांची वैयक्तिक माफीही मागितली. यावेळी अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. मृत झालेल्या शाळकरी मुलाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आपल्या विभागाशी थेट संबंध नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता या कुटुंबासाठी ह्रदयस्पर्शी ठरली.

आपला जन्म झोपडपट्टीत झाला. नगरपालिकेने बांधलेल्या वसाहतीमुळे हक्काचा निवारा मिळाला होता. मात्र त्यात राहण्यासाठी पोटचा गोळाच सोबतीला नाही, याचे मोठे दु:ख आहे. कलेक्टरांसारख्या मोठ्या अधिकाऱ्याने घरी बोलावले याचे अगोदर आश्चर्य वाटले. त्यांनी माझ्याशी संवाद साधत माझे दु:ख समजून घेतले. त्यामुळे मन हलके झाले. - राधा संमुखराव, (मृत मुलाची आई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com