चोरट्याच्या टिकाव हल्ल्यात दांपत्य गंभीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

उमरगा - चोरट्याने टिकावद्वारे हल्ला केल्यामुळे दांपत्य गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील शिवपुरी कॉलनीमध्ये मंगळवारी (ता. 31) मध्यरात्री घडली. चोरट्याने घरमालकाच्या पोटावर, तर त्यांच्या पत्नीच्या तोंडावरच टिकावचा घाव घातला. पंधरा मिनिटांच्या या थरारानंतर चोरटा पसार झाला. जखमी दांपत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उमरगा - चोरट्याने टिकावद्वारे हल्ला केल्यामुळे दांपत्य गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील शिवपुरी कॉलनीमध्ये मंगळवारी (ता. 31) मध्यरात्री घडली. चोरट्याने घरमालकाच्या पोटावर, तर त्यांच्या पत्नीच्या तोंडावरच टिकावचा घाव घातला. पंधरा मिनिटांच्या या थरारानंतर चोरटा पसार झाला. जखमी दांपत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तयार कपड्यांचे व्यापारी हरीश चंद्रकांत माखिजा यांचे शिवपुरी कॉलनीतील घर आहे. हरीश यांची स्नुषा उपचारानिमित्त शहरातील खासगी रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा गिरीश रुग्णालयातच होता. घरात हरीश व त्यांची पत्नी मधू असे दोघेच होते. रात्री दीडच्या सुमारास हरीश यांना जाग आली. मोबाईलची बॅटरी उतरल्याने चार्जर घेण्यासाठी ते बाजूच्या खोलीत जात होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्यावर हल्ला केला. आवाजामुळे मधू जाग्या झाल्या. त्या वेळी चोरटा व पती यांच्यात झटापट सुरू असल्याचे त्यांना दिसले. पुढे सरसावल्यानंतर चोरट्याने जिन्याजवळ पडलेल्या टिकावने मधू यांच्या तोंडावर वार केला. त्यांचे विव्हळणे, आरडाओरड सुरू झाल्यामुळे चोरट्याने धूम ठोकली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. वडदे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आघात एवढा जबरदस्त होता, की टिकाव मधू यांच्या जबड्यात आरपार घुसले. घटनास्थळी ते काढणे अशक्‍य झाले. पोलिसांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉ. बापूराव उपासे यांनी तोंडात घुसलेले टिकाव काढून उपचार सुरू केले. जखम गंभीर असल्याने आज शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, टिकावच्या हल्ल्यात हरीश हेही जखमी झाले.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी घटनास्थळी पाहणी करून जखमींची विचारपूस केली.

चोरटा घरात आलाच कसा?
माखिजा कुटुंबीयांनी घराचे सर्व दरवाजे बंद केलेले होते. त्यामुळे चोरटा नेमका आला कुठून, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्याच्या पायाचे ठसेही पोलिसांना दिसले नाहीत. पोलिसांनी परिसरातील पालावरच्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना रुग्णालयातील हरीश यांच्यासमोर नेण्यात आले; परंतु त्यांनी दोघांना ओळखले नाही.

Web Title: Serious attack couple in umarga