सहायक आयुक्तांसह सात जणांची एव्हरेस्ट बेस कॅम्‍पवर यशस्‍वी चढाई

मंगेश शेवाळकर
रविवार, 3 जून 2018

श्री. शेवाळकर यांच्‍यासह पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार, सहाय्यक संचालक धनराज पांडे, जिल्‍हा उपनिबंधक आदिनाथ दगडे, ॲड. सचिन रणदिवे, व्यावसायिक बबन हैबततपुरे व मोहन पटेल यांनी ग्रुप तयार केला. त्‍यानंतर मे महिन्यात एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍पवर चढाई करण्याचे निश्चित करण्यात आले.

हिंगोली - येथील जीएसटी विभागातील सहाय्यक आयुक्‍त निलेश शेवाळकर यांच्‍यासह इतर सहा जणांनी अतिशय कठीण समजला जाणारा एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍पवरील चढाई यशस्‍वीपणे पूर्ण केली आहे. बेस कॅम्‍पजवळील सुमारे साडेपाच हजार मीटर उंचीचा काला पत्‍थर हा पर्वत सर केला आहे.

राज्‍यातील कळसूबाई शिखरासह इतर गड किल्‍ल्‍यावर ट्रेकींग केल्‍यानंतर एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍प त्‍यांना खुणावू लागले होते. त्‍यासाठी श्री. शेवाळकर यांच्‍यासह पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार, सहाय्यक संचालक धनराज पांडे, जिल्‍हा उपनिबंधक आदिनाथ दगडे, ॲड. सचिन रणदिवे, व्यावसायिक बबन हैबततपुरे व मोहन पटेल यांनी ग्रुप तयार केला. त्‍यानंतर मे महिन्यात एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍पवर चढाई करण्याचे निश्चित करण्यात आले. त्‍यासाठी सुमारे तीन महिने आधीपासून सराव सुरु केला. तेथील वातावरणाचा अभ्यास करून त्‍या वातावरणात स्‍वतःला कसे जुळवून घेता येईल. शारिरीक तंदुरस्‍ती कशी ठेवता येईल याकडे लक्ष दिले. त्‍यानंतर मुंबई येथून नेपाळ गाठले. त्‍या ठिकाणावरून खरा प्रवास सुरु झाला. 

ता. ६ मे रोजी लुकला येथून त्यांची ट्रेकींगची मोहिम सुरु झाली. सकाळी साडेसहा ते दुपारी दोन या वेळेपर्यंत दररोजचा टप्‍पा पार केला जात होता. बेस कॅम्‍प ट्रेक करताना खराब वातावरण, उणे 15 ते 20 अंश सेल्सियस तापमान, अधिक उंचीवर 50 टक्केच असलेले ऑक्‍सिजनचे प्रमाण, अल्टीट्यूड सिकनेस अशा विविध आव्हानांचा सामना करत बारा दिवसांमध्ये त्यांनी पाच हजार 364 मीटरचा बेस कॅम्‍प ट्रॅक पूर्ण केला. बेस कॅम्‍पजवळील काला पत्थर हा पाच हजार 648 मीटर उंचीचा पर्वत सर केला. ता. १८ मे रोजी बेस कॅम्‍पवरून लुकला येथे परत आले. या मित्रमंडळींना आता माउंट एव्‍हरेस्‍ट खूणावू लागले आहे.

माउंट एव्‍हरेस्‍टवर चढाई करणार - निलेश शेवाळकर
माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्‍प ट्रेक करताना शारीरिक क्षमतेचा कस लागला. मात्र माऊंट एव्‍हरेस्‍टचा निम्‍म्‍यापेक्षा अधिक टप्‍पा पार केल्‍याने आमच्‍यातील आत्‍मविश्वास वाढला आहे. पुढील काळात माउंट एव्‍हरेस्‍टवर चढाई करण्याचे आमचे स्‍वप्‍न आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या तरुणांनी अतिउत्‍साहपणा न दाखवता शिस्त पाळणे आवश्यक आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्‍प जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी दररोज किमान दहा किलोमिटर चालणे, सायकलिंग आदीचा सराव केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये जमतील तेवढे जास्त ट्रेक करावेत व नियमित व्यायाम करावा.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Seven people along with the assistant commissioners successfully climb the Everest base camp