माजलगावात माजी नगरसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

माजलगाव शहरातील भीमनगर भागातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ काही जमाव जमविण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक राजेश साळवेंसह सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजलगाव (जि. बीड) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमनगर येथे मंगळवारी (ता. १४) रात्री साडेसातच्या सुमारास जमाव जमविला. यामुळे सद्यस्थितीत लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक राजेश साळवेंसह सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने साथरोग आपत्ती व्यवस्थापनसह जमावबंदी कायदा लागू केलेला आहे. मंगळवारी (ता. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वांनी घरीच साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. याचे पालन करीत सर्वांनी हे आवाहन पाळून डॉ. आंबेडकरांची जयंती घरीच साजरी केली.

हेही वाचा - ऊसतोड मजुरांना तपासणी करून मूळ गावा पाठवा - धनंजय मुंडे

रात्री साडेसातच्या सुमारास जयंतीनिमित्त शहरातील भीमनगर भागातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ काही जमाव जमविण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ भीमनगर येथे धाव घेऊन माजी नगरसेवक राजेश साळवे यांच्यासह जमावातील काही जणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस कर्मचारी अंबादास बेले यांच्या फिर्यादीवरून राजेश साळवेसह इतर सात जणांविरुद्ध जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven people, including a former councilor, were charged