लातूर जिल्ह्यातील सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

लातूर - जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांची खांदेपालट केली आहे. जवानाला मारहाण केल्याप्रकरणातील वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे यांची आर्थिक गुन्हे शाखेला बदली केली आहे. तर पानगावच्या प्रकरणानंतर नियंत्रण शाखेत आलेल्या एल. व्ही. राख यांच्यावर वाहतूक शाखेची जबाबदारी देत पोलिस अधीक्षकांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकला आहे.

जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होणार याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट केली आहे.
काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक सुनील ओव्हळ यांची नांदेड येथे बदली झाली होती. त्यामुळे हे पद रिक्त होते. या ठिकाणी गांधी चौक पोलिस ठाण्याचा कारभार संभाळणारे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्याकडे आता विवेकानंद चौक या संवेदनशील पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. श्री. भातलवंडे यांच्या जागी चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. आर. नागरगोजे यांची बदली करण्यात आली आहे.

औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. ए. जाधव यांची चाकूर येथे बदली करण्यात आली आहे. अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. आय. चाऊस यांची औसा येथे बदली करण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आर. एस. तट यांना अहमदपूर पोलिस ठाणे देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एका जवानाला मारहाण केल्याप्रकरणात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे चर्चेत आले होते. त्यांच्यावर आता आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पानगाव येथे एका उत्सवात पोलिस कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांनी धिंड काढली होती. या प्रकरणात तेथील रेणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एल. व्ही. राख यांना नियंत्रण कक्ष दाखविण्यात आला होता. त्यावेळेपासून ते नियंत्रण कक्षातच काम करीत होते. आता त्यांच्यावर वाहतूक शाखेची जबाबदारी देऊन डॉ. राठोड यांनी त्यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे.

Web Title: seven police officer transfer