तरुणीला रूमवर बोलावणे आले अंगलट, सात वर्षांचा तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

बीड शहरात नोकरीनिमित्त राहणाऱ्या तरुणाने तेथेच नोकरी करणाऱ्या अन्य तरुणीला रूमवर बोलावून घेतले अन्‌ लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. वारंवार बलात्कार केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणात येथील न्यायालयाने शनिवारी (ता. दोन) आरोपीस सात वर्षे कारावास व पाच हजारांचा दंड ठोठावला. 

बीड - लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी शनिवारी (ता. दोन) सात वर्षे कारावासाची शिक्षा व पाच हजाराचा दंड ठोठावला. 

सुरेंद्र विद्याधर हिवाळे (रा. तलेगाव, ता. धारूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुरेंद्र व पीडित तरुणी बीड शहरात नोकरीनिमित्त वेगवेगळ्या रूममध्ये राहत होते. सुरेंद्र व पीडितेची ओळख झाल्यानंतर पाच जून 2014 ला सुरेंद्रने "तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे,' असे म्हणून पीडितेला रूमवर बोलावले.

रूमवर आल्यानंतर तुझ्याशी लग्न करायचे म्हणून त्याने तरुणीवर बलात्कार केला. त्याने पीडितेवर सतत अत्याचार केला. नोव्हेंबर 2014 नंतर पीडितेने सुरेंद्रला विवाह करण्याचा आग्रह धरला; परंतु सुरेंद्रने लग्नास नकार दिला. त्यामुळे 26 मार्च 2015 ला पीडितेच्या तक्रारीवरून सुरेंद्रविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात झाली. सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस कर्मचारी बिनवडे यांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven-year sentence for rape accused