पंतप्रधान आवासातून ७५ घरकुलांचे काम पूर्ण, वीस कोटींची मागणी करुनही रक्कम मिळेना

अविनाश काळे
Monday, 28 September 2020

पंतप्रधान आवास योजनेतून शहरातील घरकुल बांधकामाला मध्यंतरी गती मिळाली होती. मात्र लॉकडाउनमुळे तीन महिन्यांत बांधकामाचे शिथिलता आली होती.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पंतप्रधान आवास योजनेतून शहरातील घरकुल बांधकामाला मध्यंतरी गती मिळाली होती. मात्र लॉकडाउनमुळे तीन महिन्यांत बांधकामाचे शिथिलता आली होती. आता पुन्हा बांधकामाला गती मिळली असून अडीच लाख रुपये अनुदानापैकी बांधकामाची स्थिती पाहुन पहिल्या हप्त्याची रक्कम २३० त्यापैकी १५६ लाभार्थींना दुसऱ्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान ९६५ मंजूर घरकुलांपैकी ५३१ लाभार्थींना बांधकाम परवाने देण्यात आले आहेत.

त्यापैकी २९१ लाभार्थींनी घराचे बांधकाम सुरू केले असून ७५ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर ४४ घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरासाठी २०२२ पर्यंत टप्प्याटप्याने एक हजार ३७६ घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट्ये आहे. या योजनेत गृहकर्ज आणि अनुदान या बाबींचा समावेश होता. मात्र अनुदान योजनेच्या घरकुलाला प्रथम प्राधान्य देण्यात आले.

अँटिजेन चाचणी केंद्रात नियोजनाचा अभाव, उस्मानाबादेतील कोरोना संसर्ग अशाने संपेल...

पालिकेने पहिल्या टप्प्यासाठी मार्च २०१८ अखेरला बेनिफिसरी लिड कन्स्ट्रक्शन घटकातून (अडीच लाख अनुदान) ९६५ लाभार्थींसाठी ६७ कोटी रूपये खर्चाचा कृती आराखडा औरंगाबादच्या गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडे सादर केला होता. त्यानंतर राज्यस्तरीय मंजुरी व सहनियंत्रण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ३० ऑक्टोबर २०१८ रोजी ९६५ घरांच्या प्रस्तावासाठी  २४ कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये मंजूर केले. प्रस्तावाच्या मंजूरीनंतर लाभार्थींकडून बांधकाम परवान्यासाठीच्या आवश्यक त्या कागदपत्राची मागणी करण्यात आली. त्यानुसार बांधकाम परवाने देण्यात आली.

वीस कोटी २६ लाखांची रक्कम प्राप्त होईना
घरकुलासाठी २४ कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये मंजूर झाले असले तरी पहिल्या टप्प्यात तीन कोटी ८६ लाख रुपये प्राप्त झाले होते. ५३५ प्रस्तावापैकी ५३१ लाभार्थींना देण्यात आलेल्या  बांधकाम परवान्यांपैकी २९१ जणांनी घरांचे बांधकाम सुरू केले असून बेसेमेंट लेव्हलपर्यंत बांधकाम केलेल्या घरांचे जीओटॅगचे काम झाल्याने २३० लाभार्थींच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची एक लाखाची तर यातीलच १५६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील एक लाख असे एकुण तीन कोटी ८६ लाख रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

मोसंबीची फळ गळती वाढत चालली; भाव चांगला, पण नुकसान सुरुच

सध्या ७५ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून १३२ घराचे स्लॅबचे तर २५ घराचे नेन्टल लेवलपर्यंत बांधकाम पूर्ण झाले आहेत. ५५ लाभार्थीच्या घराचे बांधकाम बेसेंमेंटपर्यंत आले आहेत. तूर्त पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची एक कोटी ३५ लाख पन्नास हजाराची रक्कम लाभार्थ्यांना द्यावयाची आहे. अनेक लाभार्थी बँक खात्यावर रक्कम जमा होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. मात्र मागणी केलेली एकुण २० कोटी २६ लाखांची रक्कमच प्राप्त होत नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत.

नवीन घरकुलाच्या नोंदणीसाठी होतेय विचारणा
९६५ पैकी घरकुल मंजूर असलेल्या उर्वरित ४३४ लाभार्थ्यांना बांधकाम परवान्यासाठीचे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन पालिकेतर्फ करण्यात येत आहे. लॉकडाऊन व महागाईमुळे अनेक लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान नवीन घरकुलाच्या नोंदणीसाठी अनेक व्यक्ती पालिकेकडे विचारणा करीत आहेत. मात्र नवीन नोंदणीच सुरू नसल्याने अडचणी येत आहेत. ८५५ लाभार्थ्यांना बँकेच्या कर्ज प्रस्तावाचे आहेत. त्यांनाही ना कर्ज ना सबसिडी मिळाली नाही. मात्र स्वतंत्रपणे सोळा लाभार्थीनी बँकेकडे प्रस्ताव दाखल केलेले आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventy Five Gharkul Works Complete Umarga News