हिंगोलीत सतरा जुगाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

हिंगोली शहर परिसरातील शेतातील बांधावर एका बाभळीच्या झाडाखाली काही जण जुगार खेळत असल्याची माहिती स्‍थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला असता १७ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

हिंगोली : शहरातील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ४६ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २८) करण्यात आली. कोरोनामुळे जिल्हाभरात संचारबंदी असताना जुगारी मात्र बिनधास्त एकत्र येत जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे.

शहर परिसरातील शेतातील बांधावर एका बाभळीच्या झाडाखाली काही जण जुगार खेळत असल्याची माहिती स्‍थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्‍याप्रमाणे पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक जे. आर. भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी घटनास्‍थळी छापा टाकला.

हेही वाचाहिंगोलीत चिमुकले बैठे खेळात व्यस्त

तिघांना घेतले ताब्यात

 या वेळी गोपाल कुटे, आसीम पठाण, दुर्गेश मस्‍के, श्याम कुटे, पुरुषोत्तम बांगर, आजीस (सर्व रा. मंगळवारा, हिंगोली), लखन सांगळे (रा. भारती विद्यामंदिराजवळ, हिंगोली), शफी रफिक (रा. मंगळवारा, हिंगोली), गजानन (रा. महादेववाडी), श्याम थिटे (रा. मंगळवारा), अनिल काळे (रा. तलाब कट्टा), अमोल दरुगे (रा. मंगळवारा, हिंगोली), विशाल सांगळे (रा. पोळा मारोती, हिंगोली), शंकर सांगळे, महेश थिटे, योगेश थिटे (तिघेही रा. महादेववाडी, हिंगोली), शेख इम्रान (रा. बावन खोली) हे सर्वजण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. 

पोलिस आल्याचे पाहून जुगारी पळाले

यापैकी गोपाल कुटे, आसीम पठाण, दुर्गेश मस्‍के यांच्यासह रोख रक्कम , मोबाइल, जुगाराचे साहित्य, असा एकूण ४६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. इतर जुगारी पोलिस आल्याचे पाहून पळून गेले. राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्‍थापन कायद्यांतर्गत तसेच जुगार कायद्याप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ही कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, आशिष उंबरकर, शंकर ठोंबरे, सुनील आंभोरे, आकाश टापरे, दीपक पाटील, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.

येथे क्लिक करा-  शेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून

वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा

कळमनुरी : कळमनुरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गिरामवाडी गावाजवळील कुंभारवाडीकडे जाणाऱ्या रस्‍त्यावर गुरुवारी दिनेश जैयस्‍वाल (रा.कुंभारवाडी) हा ट्रॅक्‍टरने (एमएच-३८,बी-६८८९) विनापरवाना वाळूची वाहतूक करीत होता. ट्रॅक्‍टरचालकाकडे वाळू वाहतुकीचा व वाहन चालविण्याचा परवाना आढळून आला नाही. जवळा बाजार येथील नीलेश शिंदे यांचे ट्रॅक्टर असल्याचे चालकाने सांगितले. याबाबत पोलिस कर्मचारी शिवाजी बंदुके यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्‍टरचालक दिनेश जैस्‍वाल व मालक नीलेश शिंदे यांच्याविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्‍लंघन करणाऱ्या दुकानदारावर कारवाई

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथील सिद्धेश्वर किराणा दुकानावर शुक्रवारी सहा ते साडेसहाच्या दरम्‍यान किराणा दुकानचालक रमेश हाके याने १४४ कलमचे उल्‍लंघन करत दुकानावर सहा ते सात ग्राहक घोळक्‍याने जमवून व्यापार करताना व कोरोना विषाणूपासूनच्या संरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता आढळून आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रवी हुंडेकर यांच्या फिर्यादीवरून रमेश हाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventy gambling offenses in Hingoli, Hingoli news