दुष्काळामुळे वृद्ध शेतकऱ्याचा अन्नत्याग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

बीड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या अंबाजोगाई तालुक्‍यातील शेपवाडी येथील वृद्ध शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग करून गावच्या मंदिरातच उपोषण सुरू केले आहे. 

अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्‍यात पावसाअभावी पीकपाणी नाही. दोन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नाही. या विवंचनेतून शेपवाडी येथील वृद्ध शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग करून गावच्या मंदिरातच उपोषण सुरू केले आहे. 

तालुक्‍यात सध्या दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पावसाअभावी यंदा थोड्या पावसावर उशिरा पेरणी झाली. पेरणीनंतर पुन्हा पाऊसच न झाल्याने पिके वाळून गेली आहेत. पाण्यासाठी गावात टॅंकर सुरू आहेत. जनावरांना चारा नाही, पाण्याची मोठी अडचण आहे. त्यामुळे ही जनावरे जगवायची कशी? हा प्रश्न आहे. या परिस्थितीला कंटाळून उत्तम शेप यांनी अन्नत्याग करून गावाच्या मंदिरातच उपोषण सुरू केले आहे. रविवारी (ता. 25) त्यांच्या अन्नत्यागाचा दुसरा दिवस होता. 

श्री. शेप यांच्या अन्नत्यागामुळे ग्रामस्थही चिंतेत आहेत. त्यांच्यासोबत ग्रामस्थही मंदिरात बसू लागले आहेत. शासनाकडूनही अद्याप या दुष्काळावर उपाययोजना नाहीत. मागील वर्षी रब्बी गेली, तर यंदा खरीप गेले. आता पुढच्या रब्बीचाही भरवसा नाही. यामुळे तालुक्‍यात प्रत्येक गावात उदास वातावरण आहे. पाऊस कधी पडतो आणि विहिरी, तलाव कधी भरतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Severe famine crisis