
बीड जिल्ह्यातील कडा येथील विद्यार्थिनींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर डॉक्टरने लैंगिक समस्यांची जाहिरात लावली असून, पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कडा (ता. आष्टी) येथील भगिनी निवेदिता कन्या विद्यालयात घडला आहे.
कडा (जि. बीड) - जिथं ज्ञानाच्या पवित्र मंदिरात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी "बेटी बचाव, बेटी पढाव'सारखे सुसंस्काराचे धडे दिले जातात, त्या कन्या विद्यालयाच्या परिसरात कुणाचीच परवानगी न घेता एका डॉक्टरने लैंगिक समस्यांची जाहिरातबाजी करून सामाजिक बांधिलकी पायदळी तुडवली आहे.
"असल्या' जाहिरातीबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार बीड जिल्ह्यातील कडा (ता. आष्टी) येथील भगिनी निवेदिता कन्या विद्यालयात घडला आहे.
हेही वाचा - रात्री छतावर एक महिला दाेन तरुणांसाेबत हाेती, दारूही ढाेसली..
आष्टी तालुक्यातील कडा येथे एकमेव भगिनी निवेदिता कन्या विद्यालय आहे. याच पवित्र ज्ञानमंदिरात कड्यासह ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी संस्कारसंपन्न, उज्वल भविष्य घडविण्यासाठी धडे गिरवत असतात. मात्र, याच कन्या शाळेच्या परिसरात सामाजिक भावना गुंडाळून लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणून मिरवणाऱ्या एका डॉक्टरने पेंटरच्या माध्यमातून कसल्याही प्रकारची व कुणाचीही परवानगी न घेता चक्क शाळेच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोठ्या अक्षरात जाहिरातीने रंगवून ठेवल्या आहेत.
हेही वाचा - स्मार्टफाेन, गेमिंगमुळे मुलांमध्ये वाढताहेत मानसिक आजार
शाळेच्या ये-जा करण्याच्या मुलींच्या मार्गावर जाहिरातबाजी करून या डॉक्टरने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. हा प्रकार पाहून पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय अशा प्रकारची लैंगिकतेची जाहिरातबाजी करणाऱ्यांवर शिक्षण विभागाने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
शाळा हे ज्ञानदानाचं पवित्र मंदिर आहे. त्यामुळे व्यवसायासाठी कुठल्याही शाळेच्या परिसरात असली जाहिरात करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्यकाने सामाजिक भान ठेवणे अपेक्षित असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
-सुनील देशमुख
भगिनी निवेदिता कन्या विद्यालयाच्या परिसरात अशा प्रकारची जाहिरात करणाऱ्या डॉक्टरशी संपर्क साधण्यात आला आहे. पेंटरला सांगून सदर जाहिरात काढण्यात येईल, असे डॉक्टरकडून सांगण्यात आले आहे.
-सुहास देशपांडे, मुख्याध्यापक