Latur : घरफोड्या करणाऱ्या तिघांना बेड्या| Shackles the three burglars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेड्या

Latur : घरफोड्या करणाऱ्या तिघांना बेड्या

लातूर : घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात घरफोडीचे सात गुन्हे उघड झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रकमेसह ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करून तपास केला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतील गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत होती.

यात शहरामध्ये विविध पोलिस ठाण्याचे हद्दीत घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित हे बीड, अहमदनगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याची खात्रीशीर माहिती पथकांना मिळाली. त्यामुळे शुक्रवारी (ता. दोन) या दोन जिल्ह्यांत पथके रवाना करण्यात आली होती. या पथकांनी शनिवारी (ता. ३) अमोल धर्मा इगवे (वय २८, रा.उमापूर, ता. गेवराई, जि. बीड), गणेश मिलिंद सूर्यवंशी (२३, रा. घुमेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व विकास सुनील घोडके (२७, रा.शेवगाव, जि. अहमदनगर) या संशयितांना ताब्यात घेतले.

आणखी एका साथीदारासह लातूर शहरात घरफोडीचे गुन्हे करून दागिने, रक्कम लंपास केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांनी संगनमत करून शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. या गुन्ह्यातील ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे, संतोष देवडे, मोहन सुरवसे, रवी गोंदकर, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील आदींनी या कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :policeMarathwadathief