मुक्या प्राण्यांना ताज्या चपात्या, लातूरच्या प्राणीप्रेमी शहा परिवाराचा पुढाकार

Charity Works Give Foods To Animals Latur News
Charity Works Give Foods To Animals Latur News

लातूर : हॉटेल, धाबे, मंगल कार्यालयातील उरलेल्या, टाकून दिलेल्या अन्नावर जगणारे मुके प्राणी टाळेबंदीमुळे सध्या भुकेले राहत आहेत. खायला मिळत नसल्याने अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर लातुरातील एका प्राणीप्रेमी कुटुंबाने पुढाकार घेऊन स्वंयपाकासाठी खास आचारी नेमला. त्यांच्याकडून चपात्या तयार करून हे कुटूंब शहरात भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांना ताज्या चपात्या खाऊ घालत आहे. शहरात गस्त घालत असताना पोलिसांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी या कुटूंबाला अक्षरश: सॅल्यूट केला.


कोरोनाचा संसर्ग वाढू म्हणून सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल, धाबे, मंगल कार्यालये बंद आहेत. कौटुंबिक सोहळेही बंद झाले आहेत. त्यामुळे शिळे अन्न किंवा उरलेले अन्न टाकून देण्याचे प्रमाण बंदच झाले आहे. याचा परिणाम मुक्या प्राण्यांना सहन करावा लागत आहे. अन्न मिळत नसल्याने काही कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचेही दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर लातूरमधील अभय शहा आणि त्यांच्या कुटूंबाने कुत्रे-मांजर अशा मुक्या प्राण्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.


शहा म्हणाले, रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराच्या आवारात शतपावली करत होतो. त्यावेळी मला भुकेले कुत्रे अन्नाच्या शोधात फिरताना दिसले. हॉटेल, धाबे बंद असल्याने हे कुत्रे कसे जगत असतील, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मुक्या प्राण्यांना मदत करायची असा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी आचारी नेमला. तो दररोज सायंकाळी घरी येतो. ६० ते ७० चपात्या बनवून देतो. त्या चपात्या आम्ही कुटुंबीय चंद्रनगर, मध्यवर्ती बसस्थानक, भालचंद्र रक्तपेढी, जैन मंदिर, गुळ मार्केट चौक या भागात जाऊन तेथील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतो. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आम्ही हे करतोय.

त्यामुळे कुत्र्यांना आम्ही किती वाजता चपात्या खाऊ घालण्यासाठी येतो, हे कळलेले आहे. बरोबर त्या वेळेस ते जमलेले असतात.आम्ही मुक्या प्राण्यांचा चपात्या खाऊ घालत आहोत, हे पोलिसांना शहरात गस्त घालताना दिसले. त्यावेळी त्यांनी आपले वाहन थांबवून आमचे छायाचित्र घेतले आणि आमच्या कार्याचे कौतूकही केले, असा अनुभवही सांगत शहा यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी आपापल्या भागातील भटक्या कुत्र्यांना, मांजरांना अन्न देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com