निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी उभारलेला शामियाना कोसळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

हिंगोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्‍त करण्यात आलेल्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी सात वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे बोलावण्यात आले होते. त्‍यानंतर काही वेळातच जोराच्‍या वाऱ्यामुळे शामियानाचा काही भाग खाली कोसळला.

हिंगोली : हिंगोली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी नियुक्‍त केलेल्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्‍या शामियाना बुधवारी (ता. 17) वाऱ्यामुळे कोसळला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या प्रकारानंतर प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्‍त करण्यात आलेल्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी सात वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे बोलावण्यात आले होते. जिल्‍हा प्रशासनाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठाण मांडून कर्मचाऱ्यांना त्‍यांना देण्यात आलेल्‍या गावांची माहिती देवून मतदानासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, व्‍हीव्‍ही पॅट देण्यात आले. सदर साहित्‍य घेतल्‍यानंतर प्रशासनाकडून देण्यात आलेल्‍या पाकिटामध्ये सर्व कागदपत्रे आहेत की नाही, मतदान यंत्र सुस्‍थितीत आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी कर्मचारी शामियानामध्ये बसले होते. सकाळपासूनच साहित्‍याची तपासणी झाल्‍यानंतर अधिकारी कर्मचारी त्‍यांना नियुक्‍ती दिलेल्‍या केंद्रावर रवाना होवू लागले होते. दुपारच्‍या वेळी सर्व कर्मचारी रवाना झाले. त्‍यानंतर काही वेळातच जोराच्‍या वाऱ्यामुळे शामियानाचा काही भाग खाली कोसळला. विशेष म्‍हणजे लोखंडी पाईप असलेला शामियाना खाली कोसळल्‍याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्‍या ठिकाणी धाव घेतली. मात्र तेथे कोणालाही इजा झाली नाही. 

सुदैवाने मंडप कोसळण्यापूर्वीच कर्मचारी मतदान यंत्र घेवून रवाना झाल्‍याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकारामुळे मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या ठिकाणी कर्मचारी बसले असते तर मोठा अनर्थ झाला असता, त्‍यामुळे प्रशासनाच्‍या हलगर्जीपणाबाबत कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Web Title: Shamiana collapsed which constituted for election employees in hingoli