शांघाई ऑटोमोटिव्ह झाली गुजरातवासी! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

जनरल मोटर्स ठरले कारण 
भारतीय बाजारात येण्याची घोषणा केल्याच्या अवघ्या आठवडाभरात गुजरात सरकार आणि एसएआयसी यांच्यात सामंजस्य करार झाला. जनरल मोटर्सचा बंद पडलेल्या तयार प्लांटच्या जागीच "एसएसआयसी' आपला प्रकल्प सुरू करणार आहे. 2018 पर्यंत उत्पादन करण्याच्या दृष्टीने तयार प्रकल्प हाती असेल, तर काम सोपे होईल, या दृष्टीने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद - किया मोटर्स आणि एलजीपाठोपाठ जगातील सर्वांत मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशननेही (एसआयसी) औरंगाबादला हुलकावणी दिली आहे. शांघाई मोटर्ससाठीच्या स्पर्धेत गुजरातने बाजी मारली असून, कंपनी आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे. 

चीनमधील शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (एसएआयसी) या कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरू करण्याची घोषणा केल्याच्या आठवडाभरातच हा प्रकल्प कुठे जाणार याचा फैसला झाला आहे. औरंगाबाद आणि गुजरातमधील हलोल यांच्यात हा प्रकल्प आपल्याकडे नेण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होती. यात गुजरातने बाजी मारली असून, औरंगाबादेतून सलग तिसरा उद्योग गेल्याने मराठवाडा पुन्हा एकदा मोठ्या गुंतवणुकीला मुकला आहे. 

औरंगाबादेत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीत अद्याप एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. कियो मोटर्सचा प्रकल्प औरंगाबादेत येता येता तेलंगाणाच्या दिशेने गेला. या शिवाय तीस हजार लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेली दक्षिण कोरियन कंपनी एलजी इलेक्‍ट्रॉनिक्‍सनेही औरंगाबादेत चाचपणी केली होती. हा प्रकल्पही स्थानिक राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नागपूरला गेला. "एसएआयसी'शी औरंगाबादसाठी बोलणी सुरू असल्याची खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुष्टी केली होती. असे असतानाही हा प्रकल्प औरंगाबादेत न येता गुजरातकडे गेल्याने आरंभीच्या 2000 कोटींच्या गुंतवणुकीला मुकावे लागले आहे. 

जनरल मोटर्स ठरले कारण 
भारतीय बाजारात येण्याची घोषणा केल्याच्या अवघ्या आठवडाभरात गुजरात सरकार आणि एसएआयसी यांच्यात सामंजस्य करार झाला. जनरल मोटर्सचा बंद पडलेल्या तयार प्लांटच्या जागीच "एसएसआयसी' आपला प्रकल्प सुरू करणार आहे. 2018 पर्यंत उत्पादन करण्याच्या दृष्टीने तयार प्रकल्प हाती असेल, तर काम सोपे होईल, या दृष्टीने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे बोलले जात आहे. या एका कंपनीच्या साथीला चीनचे पाच ऑटोमोटिव्ह सप्लायर कंपन्यांचे युनिटही या प्रकल्पानजीक उभारण्यात येणार असल्याने एक हजार कोटींच्या अतिरिक्त गुंतवणुकीलाही मराठवाडा मुकला आहे.

Web Title: Shanghai automotive moved into Gujarat