तुम्ही काळजी करू नका, पूनर्वसनाचे काम पूर्ण करेन या शब्दात शरद पवारांनी भूकंपग्रस्तांना दिला होता विश्वास

Sharad Pawar
Sharad Pawar

उमरगा (जि.उस्मानाबाद) : माजी केंद्रिय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांचा आज शनिवारी (ता.१२) वाढदिवस आहे. राजकारणात नेहमी अग्रेसिव्ह चर्चेत राहणारे खासदार श्री. पवार यांनी राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीची भिंत उभारली आहे. 
३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या  महाप्रलंयकारी भूकंपानंतर निर्माण झालेली भयावह परिस्थिती यशस्वीपणे हाताळून न्याय देण्याच्या केलेल्या प्रयत्नांची पंचवीस वर्षानंतर आजही भूकंपग्रस्तांच्या स्मरणात आहे.  उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात झालेला भूकंप हा मानवी मनाचा थरकाप उडवणारा होता. भूकंपाने झालेल्या जीवित व वित्तहानीचे दृश्य विदारक होते. त्यावेळीचे मुख्यमंत्री शरद पवार यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते सकाळी सात वाजता लातूरला पोहचले होते, तेथून ते किल्लारी भागात आले.

दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले स्त्री, पुरुष व बालकांचे प्रेत पाहुन शरद पवार यांच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या चिंब झालेल्या होत्या. त्यातुन ते स्वतःचे दुःख दूर ठेवून समोर वेदनांची आर्त हाक देत थांबलेल्या लोकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. क्षणाचाही विचार न करता सैन्य दलाला पाचारण केले. अन्न, वस्त्र व तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी प्रशासन व विविध सेवाभावी संस्थेला सूचना दिल्या. त्यांचा शब्दामुळे विदारक स्थितीतुन बाहेर येण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. श्री. पवार यांनी किल्लारीसह सास्तूर भागातील गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

अडचणी समजावून घेत अनेक उपाययोजना करत लोकांच्या दुःखाच ओझं हलक करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही. त्यांनी ग्रामस्थांशी साधलेल्या संवादातुन अनेक प्रश्न मार्गी लागले." कोयना भूकंपाचा संदर्भ देत येथील परिस्थिती विदारक असल्याचे सांगत आपणाला हिंमतीने पुढे जायचं आहे. त्यासाठी गावोगाव हिंडतोय असा धीर दिला.  आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी सूचना करून त्याची अंमलबजावणी केली. गावात अन्नछत्र, पाण्याची सोय त्याबरोबरच पिठाची गिरणी सुरू करण्यासाठी वीज मंडळाला सूचना दिल्या. श्री. पवार पूर्नवसनाबाबत ग्रामस्थांशी थेट चर्चा करायचे. सहा ऑक्टोबरला १९९३ रोजी त्यांनी सास्तूर भागात ग्रामस्थांशी संवाद साधला. " ही  नैसर्गिक आपत्ती आहे, त्यातुन आपणाला सावरायचं आहे.

गाव सोडायंच नाही, येथेच नवीन घरबांधणी करायची आहे. मी एका दिवसासाठी मुंबईला गेलो, तेथून ३० कोटी आणि येताना पूण्यात थांबले तेथे साडेसात कोटी घेऊन आलो आहे. आणखी मोठी मदत मिळणार आहे, तुम्ही काळजी करू नका.. मी माझा कारभार दूर ठेवीन पण पूर्नवसनाचे काम पूर्ण करेन. अशी ग्वाही ग्रामस्थांना त्यांनी दिली होती आणि प्रत्यक्षात अमलबजावणीही झाली. तत्कालिन जिल्हाधिकारी अनिल पवार यांना पूर्नवसनाच्या कामाच्या प्रारंभासाठी तयारीला लागा अशी सूचना दिली. पूर्नवसन विस्तारीत होईल, जेवढे उंबरठे असतील तेवढे घरे बांधून देण्यात येतील. घराघरामध्ये अंतर असेल. जेणेकरून भविष्यात धोका होणार नाही. चर्चेदरम्यान एका ग्रामस्थांनी मंदिराचा कल्पना मांडली. त्याला पवार साहेबांनी होकार देत पूर्नवसनाच्या रचनेत त्याचा समावेश करण्याची ग्वाही दिली आणि टप्पाटप्याने पूर्नवसनाचे काम पूर्ण झाले.

शेतकऱ्यांना दिला दिलासा
भूकंपानंतर जवळपास चौदा दिवस खासदार श्री. पवार या भागात होते. भूकंपानंतर पावसाची रिपरिप सुरू होती. कालांतराने ती थांबली. श्री. पवार ग्रामस्थांना विचारतात तुमचं गावं खरीपाच आहे की रब्बीच. त्यावेळी रब्बीचे दिवस होते. आता जमिनीला वापसा आलायं तुम्ही पेरणीच्या कामाला लागा असे सांगून ज्वारी, हरभरा, करडईच्या बियाणांनी उपलब्धता करुन दिली. दरम्यान श्री. पवार यांनी केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भूकंपाला २५ वर्ष झाल्याने ३० सप्टेंबर २०१८ रोजी बलसूर येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झाल्यानंतर श्री. पवार १८ ऑक्टोबरला भूकंपग्रस्त भागातील अतिवृष्टीने वाहून गेलेल्या शेतीची पाहणी केली. तेंव्हा श्री. पवार आणि भूकंपग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असलेल्या जिव्हाळ्याचा स्नेहबंधाला उजाळा मिळाला.


भूकंपानंतरची विदारक स्थिती व्यवस्थित हाताळून खासदार शरद पवार यांनी भूकंपग्रस्तांना दिलासा दिला. आदर्श पूनर्वसनाच्या कामात दिलेले योगदान महत्वाचे ठरले. शेतकरी केंद्रबिंदू ठरवून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची केलेली मदत मोलाची आहे. विशेषत : भूकंपग्रस्त भागातील नागरिक, शेतकरी यांच्यामध्ये श्री. पवार यांच्याबद्दल आपुलकीची भावना आहे.

- प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, उस्मानाबाद
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com