पुरस्कारामुळे आली आणखी लेखन करण्याची जबाबदारी : पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

'या पुरस्कारामुळे आणखी काही लिहावे असे वाटते. त्यासाठी तसे वेगवेगळ्या भागांतील अनुभवदेखील आपल्याकडे आहेत. महाविद्यालयात असताना आम्ही काही नाटके पाडायचो. नंतर एका नाटकात मलाच मुख्य भूमिका देण्यात आली. तेव्हा ते नाटक आमच्याच सोबतच्या विद्यार्थ्यांनी पाडले.

औरंगाबाद : आपल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यामुळे अजून लेखन करण्याची जबाबदारी आली. त्यामुळे यापुढे वेगवेगळ्या भागांत आलेले अनुभव, किस्से लेखनातून मांडण्याचा मानस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्‍त केला. मात्र, या किश्‍श्‍यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाले तर अन्य मंत्रीदेखील आपले काम सोडून किस्सेच लिहीत बसतील, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी अनेक अनुभव मार्मिक टिप्पणीसह सांगत हास्य फुलवले. 

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्‌मय पुरस्कार 'लोक माझे सांगाती' यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. पवार, तर डॉ. पटेल यांना रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी 'नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार' रविवारी (ता. 23) ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. 

'मसाप'च्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील या सोहळ्यात ते म्हणाले, ''या पुरस्कारामुळे आणखी काही लिहावे असे वाटते. त्यासाठी तसे वेगवेगळ्या भागांतील अनुभवदेखील आपल्याकडे आहेत. महाविद्यालयात असताना आम्ही काही नाटके पाडायचो. नंतर एका नाटकात मलाच मुख्य भूमिका देण्यात आली. तेव्हा ते नाटक आमच्याच सोबतच्या विद्यार्थ्यांनी पाडले. नाटक पाडल्यानंतर कसे वाटते, असे त्यांना सांगायचे होते.'' डॉ. पटेल यांनी नाट्यसृष्टीचे कार्य जगात नेले असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. पटेल यांनीही रंगमंचावरील अनुभव समोर ठेवले. पहिल्यांदा कपाळी लावलेल्या त्या गंधाचा सुवास मी कधीच विसरू शकत नाही. तसेच श्री. पवार हे बारामतीहून दौंड येथील बाजारात भाजीपाला आणताना ओल्या मातीचा येणारा गंध ते विसरलेले नाहीत, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तरुण पिढीसाठी घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा यासह इतर नवीन नाटके नव्याने रंगमंचावर येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

या वेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी निवड समितीची भूमिका मांडली. तर पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर जाधव यांनी 'लोक माझे सांगाती' या ग्रंथावर, तर ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे यांनी डॉ. पटेल यांच्या रंगभूमीविषयक कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मधुकरराव मुळे, ना. धों. महानोर, डॉ. दादा गोरे उपस्थित होते. कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रा. फ. मुं. शिंदे, कवी मंगेश नारायणराव काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar receives special award for his writing