अंकुशराव टोपे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

जालना - शिक्षण-सहकारमहर्षी अंकुशराव टोपे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. एखादा निर्धार केला की ते तडीस जाईपर्यंत ते स्वस्थ बसत नसत. विधिमंडळातही ते विधायक दृष्टिकोनातून राजकारण करायचे. त्यात ते यशस्वी झाले. त्याचे प्रतिबिंब जालना जिल्ह्यात दिसते. सूतगिरणी, साखर कारखाने, दर्जेदार शिक्षणसंस्था सुरू करून त्यांनी त्या यशस्वीपणे चालविल्या. शेतकऱ्यांचे प्रश्‍नही ते पोटतिडकीने मांडत, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टोपे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अंकुशनगर (ता. अंबड) येथे अंकुशराव टोपे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, लोकार्पण श्री. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. तीन) झाले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, सुभाष झांबड, आमदार लक्ष्मण पवार, रामराव वडकुते, शारदाताई टोपे, आमदार राजेश टोपे, सतीश टोपे, आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, बद्रीनारायण बारवाले, शेष महाराज गोंदीकर आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, "टोपे यांनी माझ्यासोबत चाळीस वर्षे काम केले. संस्थात्मक उभारणीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. शिस्त, निष्ठा यांमुळे ते यशस्वी झाले. दूर गेलेल्याला ते कधीच जवळ करीत नसत. जवळ केलेल्यांना शेवटपर्यंत साथ देत. त्यामुळे जिल्ह्यात अनेक दर्जेदार संस्थांची उभारणी झाली. अशा संस्था कशा चालवायच्या याचा परिपाठ त्यांनी घालून दिला. "मत्स्योदरी'सारख्या शिक्षणसंस्थेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली. शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न असे. शेतीला उद्योगधंद्याची जोड म्हणून सूतगिरणीसह दोन साखर कारखाने उभारले. त्यांनी उभारलेल्या अनेक संस्थांचे रूपांतर सध्या वटवृक्षात झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ते विधिमंडळात आले. पाणी, शेतीसंदर्भात अनेक प्रश्‍न मांडून त्यांनी विधायक दृष्टिकोनातून राजकारण केले. त्यांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळेच सध्या राजेश टोपे उसाला 2100 ते 2300 रुपये भाव देण्यास तयार झाले.'

श्री. बागडे म्हणाले, की टोपे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्‍न सरकारदरबारी मांडले. शेतकऱ्यांना शेतीशी पूरक व्यवसाय करता यावा म्हणून दूध संघ सुरू केला. शिक्षण, सहकारात विविध संस्था उभारल्या. राजकारण आणि संस्थांची त्यांनी कधीही सरमिसळ होऊ दिली नाही. त्यामुळेच त्यांनी उभारलेल्या संस्था यशस्वी झाल्या.

राजेश टोपे यांनी प्रास्ताविक केले. अंकुशराव टोपे यांचे स्मारक व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. आज इच्छापूर्तीचे मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले आणि वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

कोण काय म्हणाले?
अशोक चव्हाण - गोदाकाठी कार्य सुरू करून टोपे यांनी राज्यात विविध क्षेत्रांत काम केले. मराठवाड्यातील विकास प्रश्‍न सातत्याने मांडले. लोकहितासाठी झटत असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकाभिमुख होते.

रावसाहेब दानवे - जिल्ह्याच्या विकासाला बाधा येईल, असे काही करायचे नाही, याची टोपे काळजी घेत. त्यांच्याशी विविध प्रश्‍नांवर चर्चा करीत असे.

नारायण राणे - शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांत टोपे यांनी कामाचा ठसा उमटविला. शरद पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केल्यानेच ते यशस्वी झाले.

धनंजय मुंडे - अंकुशराव टोपेंनी विविध क्षेत्रांत भरीव कार्य केले. त्याचे स्मृतिस्थळ सर्वांना प्रेरणादायी ठरेल.

अर्जुन खोतकर - ज्या जागेवर शेतकऱ्यांसाठी कारकीर्द सुरू केली, त्याच जागेवर टोपे यांचे स्मारक उभारलेले आहे. ते प्रेरणादायी ठरेल.

Web Title: sharad pawar talking