शरद पवार यांच्या हस्ते पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण 

शिवचरण वावळे
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याने सकाळपासूनच शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचा परिसरात गर्दी झाली होती.

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या प्रांगणातील कै. पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे बुधवारी (ता. 20) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील, ईश्वरराव भोसीकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे, पुतळा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डाॅ. सुनील गायकवाड, आमदार प्रदीप नाईक, महापौर शीला भवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, डॉ. सुनिल कदम, भास्करराव पाटील खतगावकर, भगवान आलेगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 

नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याने सकाळपासूनच शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचा परिसरात गर्दी झाली होती. दुपारी साडेबारा वाजता अनावरण झाले तरी देखील सकाळपासून आलेल्या विविध पक्षातील आजी - माजी नेते व मान्यवरांनी आपली जागा सोडली नव्हती. अनेकांना श्री. पवार यांच्या आगमनाची प्रतिक्षा होती. दुपारी बारा वाजून वीस मिनिटाला श्री. पवार यांचे आगमन झाले आणि त्यानंतर पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री. पवार यांनी आलेल्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर त्यांनी बँकेची पाहणी करुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पुढील कार्यक्रमासाठी ते आशिर्वाद गार्डनकडे रवाना झाले. 

Web Title: Sharad Pawar unveiled the statue of Padmashree Shyamrao Kadam