दोन हजारांत भाडोत्री शार्पशूटर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - पिस्तुलाच्या धाकावर पोलिसांवर हल्ला करून कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदीला सोडवून नेण्याचा कट सोमवारी (ता. २७) गुन्हे शाखेने उधळला. यासाठी दोन हजारांच्या अनामत रकमा घेतल्यानंतर मध्यप्रदेशचे भाडोत्री शार्पशूटर शहरात ‘मोहीम’ फत्ते करण्यासाठी आले होते. यानंतरच त्यांना पूर्ण रक्कम मिळणार होती, अशी माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी मंगळवारी दिली.

औरंगाबाद - पिस्तुलाच्या धाकावर पोलिसांवर हल्ला करून कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदीला सोडवून नेण्याचा कट सोमवारी (ता. २७) गुन्हे शाखेने उधळला. यासाठी दोन हजारांच्या अनामत रकमा घेतल्यानंतर मध्यप्रदेशचे भाडोत्री शार्पशूटर शहरात ‘मोहीम’ फत्ते करण्यासाठी आले होते. यानंतरच त्यांना पूर्ण रक्कम मिळणार होती, अशी माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी मंगळवारी दिली.

इम्रान मेहंदी याच्या सुटकेसाठी मध्यप्रदेशातून सात शूटरना बोलाविण्यात आले होते. यातील सरुफखान शकूरखान (वय ४५) याला यापूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिस्तूल प्रकरणात अटक केली होती. सुमारे दोन वर्षे तो हर्सूल कारागृहात होता. याचदरम्यान मेहंदी गॅंगशी त्याचा संबंध आला. तेथे ओळख झाल्यानंतर मेहंदीला सोडविण्याचा कट तेथेच आखला गेला, असा संशय गुन्हे शाखेला आहे. जामिनावर सुटलेल्या खालेद चाऊसवरही गुन्हे शाखेला संशय आहे. इम्रान मेहंदीला सोडविण्यासाठी त्याने शोएबच्या साथीने कट रचला. याची जाणीव सरुफखान यास होती. त्याच्या माध्यमातून मध्यप्रदेशातून शार्पशूटर्सशी कटापूर्वी भेट घडवून आणली गेली. त्यांच्यात डील झाली. वाहतुकीचा व खाण्यापिण्याचा खर्च इम्रान मेहंदीशी संबंधित व्यक्ती करतील, असे ठरले. त्यानंतर अनामत रक्कम म्हणून या शार्पशूटरना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले. डीलमधील उर्वरित रक्कम मोहीम पूर्ण झाल्यानंतर देण्याचेही ठरले होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

संशयितांना  कोठडी
औरंगाबाद - सुपारी किलर इम्रान मेहंदी याला पळवून नेण्यासाठी कट रचून, फिर्यादीवर पिस्टल रोखून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या अकरा जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी शनिवारपर्यंत (ता. एक) पोलिस कोठडी सुनावली. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या फिर्यादीवरून सरुफ खान शकूर खान, नफीस खान ऊर्फ मेवाती मकसूद खान, नकीब मोहंमद नियाजू मोहंमद, फरीद खान मन्सूर खान, शब्बीर खान समद खान, फैजुल्ला खान गणी खान, शाकीर खान कुर्बान खान, शेख यासेर शेख कादर, सय्यद फैसल सय्यद एजाज, मोहम्मद नासेर मोहम्मद फारुख, मोहम्मद शोएब मोहम्मद सादेक यांना पोलिसांनी अटक करून मंगळवारी (ता. २८) न्यायालयात हजर केले होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ए. एच. जारवाल आणि सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी न्यायालयास विनंती केली, की आरोपींना अटक करून गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. ते मध्यप्रदेशातून औरंगाबादला कधी आले, येथील कोणकोणत्या स्थानिक आरोपींना भेटून गुन्ह्याचा कट रचला, पिस्टल कुठून आणले याबाबत चौकशी करायची आहे. आरोपींचे औरंगाबादेत कोण साथीदार आहेत, गुन्ह्याचा कट कधी रचला, इम्रान मेहंदीच्या साथीदारांना पिस्टल पुरविले आहे काय, वाहनांच्या मालकीबाबत दस्तऐवज हस्तगत करावयाचे आहेत, याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली.

मेहंदीच्या सुटकेनंतर मिळणार होती पूर्ण रक्कम
कटाच्या हालचाली कारागृहात
वाहन, भोजनाचीही होती जबाबदारी 

Web Title: Sharpshooter on Rent in Two Thousand Rupees