मित्राने डाटा चोरल्याने तिचे आयुष्य डिलीट! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

महाविद्यालयातील ओळखीतून मैत्री झाली. मित्र म्हणून सोबत काढलेले फोटो तिच्या मोबाईल, लॅपटॉपमधून पेनड्राईव्हद्वारे त्याने विश्‍वासघात करून चोरुन घेतले. नंतर हे फोटो महाविद्यालयातील मित्र, इतरांना शेअर करून बदनामी केली. यामुळे तिने जगाचा निरोप घेतला, अशी खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. 

औरंगाबाद - महाविद्यालयातील ओळखीतून मैत्री झाली. मित्र म्हणून सोबत काढलेले फोटो तिच्या मोबाईल, लॅपटॉपमधून पेनड्राईव्हद्वारे त्याने विश्‍वासघात करून चोरुन घेतले. नंतर हे फोटो महाविद्यालयातील मित्र, इतरांना शेअर करून बदनामी केली. यामुळे तिने जगाचा निरोप घेतला, अशी खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गौरी सुशील खवसे (वय 23, रा. हिंदुराष्ट्र चौक, गारखेडा परिसर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शुक्रवारी पहाटे तिने गळफास घेतला. ही बाब उघडकीस आल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात सुरवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर नातेवाइकांनीही घरात चाचपणी केली, पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. तसेच कुटुंबीयांना 27 मे रोजी चिठ्ठी सापडली. त्यानुसार सायीश कनाला, संकेत अडलक व पीयूष डावकर एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतात. तेथे गौरीही शिक्षण घेत होती. सायीश व गौरीची मैत्री होती. त्यानंतर त्याने गौरीला सोडून दुसऱ्या मुलीसोबत मैत्री वाढविली. मार्च 2018 पासून तो गौरीला मानसिक त्रास देत होता. गौरीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या वडिलांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिली. सायीश कनाला, संकेत अडलक, पीयूष डावकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

काही दिवसांपूर्वी सायीशने गौरीला विश्‍वासात घेत तिचा मोबाईल व लॅपटॉप घेतला. संकेत अडलक व पीयूष डावकर यांच्या मदतीने पेनड्राईव्हद्वारे त्याने गौरीसोबत स्वत:चे फोटो मिळविले. हे फोटो मित्रांना व इतरांना सोशल मीडियावर शेअर करून गौरीची बदनामी केली. अशी बाबच तिने चिठ्ठीत लिहिल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

चिठ्ठीतील मजकूर इंग्रजीत 
मृत्यूनंतर गौरीच्या घरी इंग्रजीतून लिहिलेली चिठ्ठी सापडली. यात ""मला सायीशने फसवले. माझे त्याच्यावर जिवापाड प्रेम होते; पण त्याने माझा गैरफायदा घेतला व माझी बदनामी केली. असा मजकूर चिठ्ठीत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She committed suicide by a friend of stealing data