अन् तिने जिवापाड जपून जिवलग मैत्रिणीचा केला खून, कारण...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • स्वतःचे दागिने तारण ठेवून पैसे दिले
  • परत मागितले असता केला खून
  • ज्या मैत्रिणीला जिवापाड जपले तिनेच संपविले
  • काही तासांतच आरोपी अटकेत 
     

औरंगाबाद : अडचणीत असलेल्या मैत्रिणीसाठी स्वत:चे दागिने तारण ठेवून तिला पैसे दिले; परंतु ते परत मागण्यासाठी गेलेल्या 34 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता. 25) उघडकीस आली. प्रकरणात पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासांतच मैत्रिणीचा खून करणाऱ्या आरोपी महिलेला गजाआड केले. 

विद्या तळेकर (वय 34, रा. चेलिपुरा) असे मृताचे नाव आहे. शकीला ऊर्फ निलोफर बाबू शेख (32, रा. अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका) असे आरोपी महिलेचे नाव आहे. प्रकरणात मृत विद्याचा भाऊ कपिल तळेकर (21, रा. चेलिपुरा) याने तक्रार दिली. त्यानुसार, विद्यासह तिच्या दोन्ही बहिणींचे लग्न झालेले आहे. सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी विद्या व शकिला यांची मैत्री झाली. विद्या ही शकिलाच्या घरी नेहमी येत-जात होती. विद्या अनेकदा शकिलाच्या घरी देखील राहत होती. विद्याला घेऊन दिलेली गाडी (एमएच-20, ईझेड-3382) देखील शकिलाकडे आहे. शकिला अडचणीत सापडल्याने विद्याने स्वत:च्या लग्नातील सोन्याचे दागिने तारण ठेवून आलेले पैसे शकिलाला हातउसने दिले होते. ते पैसे वारंवार मागूनदेखील ती देत नसल्याची माहिती विद्याने तक्रारदार कपिल व कुटुंबीयांना दिली होती. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

दिवाळीपासून विद्या माहेरी आली होती. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी विद्याने आई पार्वतीला मी शकिलाकडून दिलेले पैसे घेऊन येते म्हणत ती शकिलाच्या घरी गेली होती. रात्री साडेदहाला शकिलाने कपिलला फोन करून तुझी बहीण माझ्याशी भांडण करीत आहे, तू ये व तिला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार कपिल शकिलाच्या घरी गेला असता तेथे विद्या गंभीर जखमी अवस्थेत पडलेली होती. त्यामुळे कपिलने त्याची दुसरी बहीण व भावजयीला बोलावून घेत गंभीर अवस्थेत असलेल्या विद्याला खासगी रुग्णालयात आणले. तेथे डॉक्‍टरांनी विद्याला तपासून मृत घोषित केले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

काही तासांतच आरोपी अटकेत 
पोलिसांनी अवघ्या काही तासांत म्हणजे सोमवारी सकाळी 7.30 वाजता आरोपी शकिला हिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता, गुरुवारपर्यंत (ता. 28) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी सोमवारी (ता. 25) दिले. आरोपी महिलेकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करणे असून आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा तपास करणे आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी न्यायालयाकडे केली.  

हेही वाचा - तिने देहविक्रयसाठी दिला स्वतःचा फ्लॅट, नंतर.....

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She killed her friend