‘ऑरिक’मध्ये पहिल्या उद्योगाची मुहूर्तमेढ

आदित्य वाघमारे
रविवार, 6 मे 2018

ऑरिक-शेंद्रा येथे पहिल्या उद्योगाच्या उभारणीला गेल्या महिन्यात सुरवात झाली. एआयटीएलने वीज आणि पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. पायभूत सुविधांचे काम अद्याप झालेले नसतानाही उद्योग उभारणीच्या कामाला झालेली ही सुरवात प्रगतीचे लक्षण आहे. 
- महेश शिंदे पाटील, एजीएम, औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लि.

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये (ऑरिक) एका थर्माकोल उत्पादक कंपनीने सेक्‍टर पाचमध्ये आपल्या कारखान्याच्या बांधकामाला सुरवात केली असून, हा येथील पहिला उद्योग ठरणार आहे. त्यामुळे आता भूखंड वितरणासह उद्योगांच्या उभारणीलाही येथे सुरवात झाली आहे. 

शेंद्रा आणि बिडकीन येथे उभारण्यात येत असलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीपैकी केवळ शेंद्रा नोडमध्ये भूखंडांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. सुमारे ३५ उद्योगांनी येथे गुंतवणुकीसाठी रस दाखवत भूखंड घेतले आहेत.

वितरित झालेल्या भूखंडांवर उद्योग उभारणीच्या कामांना प्रारंभ झाला असून, कीर्ती थर्मोपॅक या कंपनीने ऑरिकमध्ये उद्योग उभारणीची मुहूर्तमेढ रोवली आहे. शेंद्रा येथील पायभूत सुविधांची कामे पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०१८ पर्यंतचा अवधी आहे. ते काम पूर्ण होण्यापूर्वीच या कंपनीने शेंद्रा-ऑरिक सिटीत बांधकामाला गेल्या महिन्यात सुरवात केली. भूमी सपाटीकरण, स्वच्छता आणि मार्किंगला सुमारे १५ दिवसांचा कालावधी गेल्यानंतर सुरू झालेल्या या कामाने आता वेग घेतला आहे. या कामाची पायभरणी सुरू झाली असून, काम जमिनीच्या बरोबरीने आले आहे. सुमारे तीन महिन्यांत ते पूर्ण होऊन उत्पादनही सुरू करण्यात येणार आहे. 

अन्य तीन कंपन्यांचे काम सुरू होणार
शेंद्रा येथे अन्य तीन कंपन्यांच्या उभारणीला आगामी महिन्यात प्रारंभ होणार आहे. यातील दोन कंपन्यांच्या प्लॅनला मंजुरी देण्यात आली असून, एका कंपनीचा प्लॅन औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपला प्राप्त झाला आहे. यातील एका कंपनीने बांधकामासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची ऑर्डरही दिली आहे. दिवाळीपर्यंत पाच कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू होतील, असा अंदाज एआयटीएलचा आहे.

Web Title: shendra oric business work