आजपासून शहरात पेट्रोलपंप एका शिफ्टमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - दोन दिवस पेट्रोल व डिझेलची खरेदी बंद केल्यानंतर पेट्रोलपंपाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये करण्याच्या, तसेच रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी पंप बंद ठेवण्याच्या निर्णयाची पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे शनिवारी (ता. 5) अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सचिव अखिल अब्बास यांनी दिली. 

औरंगाबाद - दोन दिवस पेट्रोल व डिझेलची खरेदी बंद केल्यानंतर पेट्रोलपंपाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये करण्याच्या, तसेच रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी पंप बंद ठेवण्याच्या निर्णयाची पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे शनिवारी (ता. 5) अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सचिव अखिल अब्बास यांनी दिली. 

ते म्हणाले, की गुरुवारी आणि शुक्रवारी पेट्रोलपंप चालकाकडून माल खरेदी करण्यात आला नाही. त्याचा फटका शहरापेक्षा ग्रामीण भागात बसण्यास सुरवात झालेली आहे. खरेदी बंद केल्याच्या दुसऱ्या दिवशी विशेषत: ग्रामीण भागातील वीस टक्‍के पेट्रोलपंप कोरडे झाले होते. शनिवारी जिल्ह्यातील पेट्रोलपंप एकाच शिफ्टमध्ये सकाळी सात ते रात्री आठपर्यंत खुले राहतील. त्याशिवाय रविवारी पेट्रोलपंप बंद राहतील. केंद्र सरकारने अपूर्व चंद्रा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही तेल कंपन्यांनी या शिफारशी लागू केल्या नाहीत. त्यामुळे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या आंदोलनाचा परिणाम दिसून येईल. पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी काही पंपावर दुचाकी, चारचाकी, रिक्षांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. बहुतांश पंपांवर 16 हजार लिटर पेट्रोलची आणि 22 हजार लिटर डिझेलची टाकी असते. साधारणत दीड दिवस हा साठा पुरतो. खरेदी बंद केल्यामुळे साठ्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. डेपोतून गुरुवारी कंपन्यांव्यतिरिक्त पेट्रोलपंपांनी खरेदी केलेली नाही. त्यामुळे टंचाई जाणवत आहे. खरेदी बंद केल्याने तीन दिवस परिणाम जाणवेल. रविवारी पंप बंद राहणार असल्याने मंगळवारनंतर स्टॉक येण्याची शक्‍यता आहे. 

मोर्चामुळे शुकशुकाट 
बहुजन क्रांती मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांककडून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख पेट्रोलपंपावर पेट्रोल असतानादेखील पेट्रोल खरेदीसाठी गर्दी नव्हती. आमच्या मागण्यांसंदर्भात ऑईल कंपन्यांची मुंबईत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती; मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आमचा पवित्रा कायम राहील, असेही अखिल अब्बास यांनी सांगितले.

Web Title: shift in the city of petrol pump today