Nana Patole : शेतकरी विरोधी सरकार; नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Nana Patole : शेतकरी विरोधी सरकार; नाना पटोले

हिंगोली : ‘‘राज्य व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना पिकाचे पंचनामे झाले नाहीत. यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत’’, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता. २८) येथे केला. हिंगोलीत येणाऱ्या भारत जोडो पदयात्रेच्या नियोजनासंदर्भात पाहणीसाठी ते आले होते. त्यानंतर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई आदी उपस्थित होते. पटोले यांनी भारत जोडो पदयात्रेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘‘पदयात्रेचा आतापर्यंत एक हजार किलोमीटरचा प्रवास झाला आहे. महाराष्ट्रात लवकरच पदयात्रा दाखल होणार आहे. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी चार दिवस पदयात्रा आहे. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात ती जाणार आहे.

पटोले यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर टीकाही केली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील उद्योग, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे, या ध्येयाने केंद्र सरकार गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबईही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे-फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे’’.