शिर्डी संस्थानने पाचशे कोटी कसे दिले?

Court
Court

औरंगाबाद - शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी पाचशे कोटींचा निधी का आणि कसा जाहीर केला? अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची तरतूद आहे का, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी शासनाला केली. याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात येईल, असे निवेदन मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सुनावणीवेळी केले. त्यावर आता या सर्व याचिकांची पुढील एकत्रित सुनावणी मंगळवारी (ता. २९) रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत संस्थानच्या निधीचा निळवंडे प्रकल्पासह इतर कुठल्याही कामासाठी वापर करू नये, असे तोंडी निर्देश खंडपीठाने दिले. 

निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या कालव्यांचे काम सुरू आहे. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकरी या कामात अडथळा आणत आहेत. काम वेळेत पूर्ण न झाल्यास २५६ कोटींचा निधी व्यपगत होईल, असा दिवाणी अर्ज ॲड. अजीत काळे यांनी खंडपीठात दाखल केला आहे. त्या अर्जासह निळवंडे धरणाशी संबंधित सर्व याचिकांवर शुक्रवारी (ता.२५) एकत्रित सुनावणी झाली.

त्यावेळी खंडपीठाने शासनाकडून वरील माहिती मागविली आहे. या धरणासाठीच्या निधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून अर्थ समितीचे मिनिट्‌स अद्याप मिळाले नाहीत. यासाठी वेळ देण्याची विनंती असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी केली. सुनावणीदरम्यान शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी देऊ केलेल्या पाचशे कोटींच्या निधीबाबत विचारणा केली असता संस्थानतर्फे पाचशे रुग्णावाहिका खरेदी करण्यात येणार असल्याचे ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तर संस्थानने औरंगाबादेतील घाटी रुग्णालय आणि इतर संस्थांनासुद्धा निधी देऊ केला असल्याचे वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर संस्थानकडे जमा होणारा पैसा हा भाविकांचा आहे, असे (तोंडी) मत खंडपीठाने व्यक्त केले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अजीत काळे, ॲड. प्रज्ञा तळेकर यांच्यासह इतर वकील, अकोले तालुक्‍यातील हस्तक्षेपकांतर्फे ॲड. सचिन देशमुख व ॲड. शेख माजीद, शिर्डी संस्थानतर्फे ॲड. नितीन भवर व महामंडळातर्फे ॲड. सुरवसे काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com