
शिरूर तालुक्यात भानकवाडी शिवारात 'बिबट्याची शिकार'
शिरूर कासार : तालुक्यातील भानकवाडी शिवारातील दोरखेडा शेतात रविवारी एका बिबट्याचा शिकारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञातावर वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने पिंजरा लावला होता. कॅमेराट्रॅपमध्येही तो दिसून आला होता. मात्र त्यास पकडण्यास वन विभागाला अपयश आले होते. त्यातच भगवानगड परिसरात बिबट्या असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र नंतर काही दिवस तो दिसून आला नाही. त्यातच रायमोह अंतर्गत येत असलेल्या भानकवाडी शिवारातील डोंगरमाथ्यावरील दोरखेडा शेतात रविवारी अज्ञाताने शिकारीसाठी जाळे लावले होते.
यात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे, वनपाल साधू धसे, वनरक्षक बी.बी.परजने, शिवाजी आघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. विच्छेदनानंतर पिंपळवंडी येथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी वनविभागाने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास विभागीय वन अधिकारी सचिन कंद यांच्या मार्गदर्शनात अशोक काकडे, वनपाल साधू धसे, वनरक्षक बी.बी. परजने करीत आहेत.
Web Title: Shirur Kasar Leopard Hunting Bhanakwadi Filed Crime Against Unkown
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..