
Shiv Jayanti 2023 : शिवजयंती उत्सवात विदेशातील कलावंत होणार सहभागी
बीड : विना वर्गणी शिवजन्मोत्सव साजरा करुन डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त यंदाही कार्यक्रमांची रेलचेल असेल. विदेशी कलावंतांचे सादरीकरण यंदाच्या मिरवणुकीतील आकर्षण असेल, तसेच ६५० कलावंतांचे ढोलपथक व अयोध्येतील लाइट शो बीडकरांना पाहायला मिळणार आहे.
ता.१९ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीतील कार्यक्रमांची रूपरेषा समितीचे अध्यक्ष शाहिनाथ परभणे व उपाध्यक्ष शेख वकील यांनी सोमवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत मांडली.
श्री. परभणे म्हणाले, महाराष्ट्रभर नावाजलेल्या महोत्सवात यंदाही आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने ढोल पथक, कला, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो, विदेशी कलाकार आणि ध्वनी प्रदूषणमुक्त अशी जयंती साजरी होईल.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज) येथे ता. १९ फेब्रुवारीला सकाळी सात ते दहापर्यंत कार्यक्रमांची रेलचेल असेल, असे श्री. परभणे म्हणाले. भाऊसाहेब डावकर, भारत झांबरे, सचिव विशाल तांदळे, सहसचिव गोरख गायकवाड, कोषाध्यक्ष अॅड. दीपक कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष कपिल धनकर, सदस्य बबलु तुपे, पवन बहिरवाळ, गुड्डू ढगे, दिघु फाटे, जीवन सुतार, विशाल वाघमारे आदींची उपस्थिती होती.
असे होतील कार्यक्रम
जयंती कार्यक्रमात २३ आंतरराष्ट्रीय शो आणि ७६ राष्ट्रीय शोमध्ये भाग घेतलेल्या कोल्हापूरच्या उत्सव इव्हेंट्सचा सहभाग असेल. तसेच करवीर नाद हा ६५० कलावंतांचे ढोल पथक असून यामध्ये १५० मुली, ४०० ढोल, १५० ताशा, १५ ध्वज व सहा खेळणी असतील. ११ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सादरीकरण करणाऱ्या अयोध्येतील आशीर्वाद लाईटचे सादरीकरण असणार आहे.
युक्रेन, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया येथील १० विदेशी फायर आर्टिस्ट देखील सार्वजनिक शिवजयंती उत्सवामध्ये सादरीकरण करणार आहेत. रविवारी (ता. १९) सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा होईल.