टेकू देणारे "फेकू' म्हणू लागले... 

भास्कर बलखंडे 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

जालना - केंद्र आणि राज्याप्रमाणेच येथील जिल्हा परिषदेवरही शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र सवत्यासुभ्यामुळे गट-गणांच्या निवडणुकीत अचानक शिवसेनेचा पवित्रा आक्रमक झाला आहे. सत्तेला टेकू देणारी शिवसेना मात्र जिल्ह्यात भाजपसोबतच नेत्यांनाही फेकू म्हणू लागली आहे. विरोधी पक्ष बाजूला राहून मित्रपक्षांतच जुगलबंदी रंगली आहे, हे विशेष. 

जालना - केंद्र आणि राज्याप्रमाणेच येथील जिल्हा परिषदेवरही शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र सवत्यासुभ्यामुळे गट-गणांच्या निवडणुकीत अचानक शिवसेनेचा पवित्रा आक्रमक झाला आहे. सत्तेला टेकू देणारी शिवसेना मात्र जिल्ह्यात भाजपसोबतच नेत्यांनाही फेकू म्हणू लागली आहे. विरोधी पक्ष बाजूला राहून मित्रपक्षांतच जुगलबंदी रंगली आहे, हे विशेष. 

जिल्ह्यात शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या खांद्यावर असल्याने त्यांनी प्रचारसभेत भाजपवर शब्दांचे बाण मारण्यास सुरवात केली आहे. अगदी "भाजप हा थापाड्या पक्ष आहे'पासून पक्षातील नेतेमंडळी फेकू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भूमी असलेल्या भोकरदन येथे नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी चक्‍क मोदी आणि दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडले. अगदी गुगलवर "फेकू' सर्च केल्यास सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांचा फोटो येतो, भोकरदनचा फेकू कोण? असे सर्च केल्यास कुणाचा फोटो दिसेल, असा मिश्‍किल सवालही त्यांनी केला, अर्थात त्यांचा रोख भाजप प्रदेशाध्यक्षांकडे होता. सत्तेत भागीदार असूनही भाजपला टार्गेट करण्याची संधी शिवसेनेकडून घेतली जात आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही आणि शेतकऱ्यांच्या अधोगतीला सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा घरचा आरोप शिवसेना करत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद आता निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना हा सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे सरकारने घेतलेले निर्णय हे दोन्ही पक्षांना बंधनकारक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल केवळ भाजपला जबाबदार धरता येणार नसल्याचा सवाल यानिमित्ताने मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. एकूणच दोन पक्षांतील अंतर्गत वादामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. 

विकासाचा मुद्दा गायब 
भाजप-शिवसेना युतीच्या राज्यस्तरावरील नेते दररोज एकमेकांविरुध्द उलटसुलट आरोप करीत आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झालेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारातून गट किंवा गणाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आहे. केवळ भाजप, शिवसेना या दोन पक्षांतील मतभेदाचा मुद्दाच हायलाईट होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील तीर्थपुरी आणि आष्टी येथील जाहीर सभेत भाजप, शिवसेना युतीच्या भांडणाचा खरपूस समाचार घेतला आहे.

Web Title: shiv sena & bjp politics in jalna