औरंगाबादच्या क्रांती चौकात उभारणार शिवरायांचा नवा पुतळा 

माधव इतबारे
शुक्रवार, 19 जुलै 2019

क्रांती चौकात नव्या चबुतऱ्याच्या उंचीला साजेशा व उड्डाणपुलाच्या उंचीनुसार नवा पुतळा बसविण्याचा ठराव गुरुवारी (ता. 19) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाला महापालिकेने सुरवात केली आहे. त्यासाठी अश्‍वारूढ पुतळा काढण्यात आला असून, आता हा पुतळा गारखेडा परिसरातील क्रीडा संकुलात बसविला जाणार आहे. क्रांती चौकात नव्या चबुतऱ्याच्या उंचीला साजेशा व उड्डाणपुलाच्या उंचीनुसार नवा पुतळा बसविण्याचा ठराव गुरुवारी (ता. 19) सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

 क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव समितीद्वारे केली जात होती. त्यानुसार एक कोटी 84 लाख रुपये खर्चाचे हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा काढण्यात आला असून, तो चिकलठाणा एमआयडीसीतील मडिलगेकर यांच्या स्टुडिओमध्ये ठेवण्यात आला आहे. दरम्यान, क्रांती चौकातील नव्या चबुतऱ्याची उंची, उड्डाणपुलाची उंची यानुसार शिवरायांचा पुतळा असावा. नवीन 21 फूट उंचीचा पूर्णाकृती अश्‍वारूढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवक राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, गोकुळसिंग मलके यांनी मांडला होता. गुरुवारच्या (ता. 18) सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव चर्चेला आला असता, सभागृहाने एकमताने त्याला मंजुरी दिली. नव्या पुतळ्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 
  
जुना पुतळा गारखेड्यात 
गेल्या अनेक वर्षांपासून क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशी शहरवासीयांचे भावनिक नाते जुळलेले आहे. त्यामुळे हा अश्‍वारूढ पुतळा गारखेडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात बसविण्यात यावा, असा ठरावदेखील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj New statue in Kranti Chowk